HomeमहामुंबईमुंबईRamdas Kadam : ठाकरेंना 20 आमदार सांभाळायचे, त्यासाठीच तथ्य नसलेले दावे; रामदास...

Ramdas Kadam : ठाकरेंना 20 आमदार सांभाळायचे, त्यासाठीच तथ्य नसलेले दावे; रामदास कदमांनी राऊतांचे आरोप फेटाळले

Subscribe

मुंबई – महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. केवळ अस्वस्थ नाहीत तर समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत. शून्यात गेले आहेत. असा गौप्यस्फोट शिंदेंच्या आमदाराने आपल्याकडे केला असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे. राऊतांच्या या दाव्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र महायुतीमध्ये कोणीही अस्वस्थ नाही, एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ‘सामना’च्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले आहे.

20 आमदार सांभाळण्यासाठीच… 

शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले, “सामनाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत आहे. ठाकरेंचे 20 आमदार निवडून आले आहेत. त्या आमदारांना आपल्यासोबत कसे ठेवायचे त्यासाठीचे सामनातून हे प्रयत्न सुरु आहेत”, असेही रामदास कदम म्हणाले.

“एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी 20-25 आमदार हे देवेंद्र फडणवीसांच्या नियंत्रणात आहेत. आजही ते फडणवीसांचे ऐकतात, संजय राऊतांच्या या दाव्यावर रामदास कदम म्हणाले, उदय सामंत हे एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी आहेत. संपूर्ण शिवसेना एकसंध आहे. सर्वांनी मिळून पक्षाबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार एकमताने एकनाथ शिंदेंना दिला आहे. त्यांनी सर्व आमदारांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेतला. ठाकरेंना त्यांचे 20 आमदार सांभाळायचे आहेत. ते सोडून जाऊ नये यासाठी ते असे बोलत आहेत,” असे रामदास कदम म्हणाले.

वर्षावर लिंबू कोणी सोडले होते ? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाही, असा सवाल करत संजय राऊत यांनी याचे उत्तर काळी जादू करणाऱ्यांना विचारले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यावर रामदास कदम यांनी म्हटले की, “उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर शेकडो लिंबू मिळाले. त्याची माहिती संजय राऊतांना आहे. म्हणूनच त्यांनी असे वक्तव्य केले असेल.” अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली.

पालकमंत्रीपदाबद्दल तटकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवावा

पालकमंत्रीपदावरुनही महायुतीमध्ये वाद असल्याचे समोर आले. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांना मिळाले पाहिजे अशी उघड मागणी होत आहे. पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर 24 तासांत रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. यावर रामदास कदम म्हणाले की, महायुतीत पालकमंत्रीपदावरुन मतभेद व्हायला नको. अजित पवारांचे उजवे हात असलेले खासदार सुनील तटकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावला पाहिजे. भरत गोगावले हे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. अदिती तटकरे या मागील सरकारमध्ये पालकमंत्री होत्या. अदिती यांच्यापेक्षा गोगावले ज्येष्ठ आहेत. त्यामुळे सुनील तटकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असे सांगण्यासही कदम विसरले नाही.

हेही वाचा : Shiv Sena : 2024 नंतरही मुख्यमंत्री राहणार या आश्वसानामुळेच एकनाथ शिंदे फुटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा