मुंबई : नामवंत कलाकारांची चित्रे असलेल्या ‘मराठी चित्रपट कट्ट्याचे’ लोकार्पण आणि मराठी व हिंदी चित्रपटात अमूल्य योगदान देणारे अभिनेते रमेश देव यांच्या नावाने अंधेरीतील एका रस्त्याचा नामकरण सोहळा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गुरुवारी (30 जानेवारी) पार पडणार आहे. याप्रसंगी, स्थानिक आमदार अमित साटम आणि दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे चिरंजीव अभिनेते अजिंक्य देव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपाचे माजी नगरसेवक रोहन राठोड यांनी दिली. (Road named after Marathi film star Katta and actor Ramesh Dev in Andheri)
मराठी आणि हिंदी चित्रपटात अमूल्य योगदान देणारे अभिनेते रमेश देव यांची 30 जानेवारी रोजी जयंती आहे. यानिमित्ताने भाजपाचे आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून अंधेरी येथील एका रस्त्याला ‘अभिनेते रमेश देव मार्ग’ असे नाव देण्यात येणार आहे. तसेच, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा गौरव करण्यासाठी अंधेरी (पश्चिम) येथे नामवंत कलाकारांची चित्रे असलेला ‘मराठी चित्रपट कट्टा’ तयार करण्यात आला आहे. या ‘मराठी चित्रपट कट्टा’चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
हेही वाचा – Mumbai : मुंबई वाहतूक कोंडींवर पर्याय, 5 वर्षात जलवाहतूक वाढवणार तर बीकेसीत पॉड टॅक्सी सुरू होणार
माध्यमांशी संवाद साधताना रोहन राठोड म्हणाले की, मराठी भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच बहाल केला आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या उन्नतीसाठी यापुढे आम्ही अखंडपणे काम करत राहू. भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मराठी चित्रपट कट्ट्याची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे मराठी चित्रपटसृष्टीचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच 30 जानेवारी रोजी दिवंगत अभिनेते रमेश देव यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने मराठी चित्रपट कट्टा आणि रमेश देव यांच्या नावाने रस्त्याच्या नामकरणाचा सोहळा पार पडणार आहे, असे रोहन राठोड यांनी सांगितले.
हेही वाचा – Mumbai Bike Taxi : मुंबईत परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी, पण ही काळजी घेण्याच्या सूचना