मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्याच राहत्या घरी जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुरुवारी (ता. 16 जानेवारी) पहाटेच्या सुमारास सैफच्या घरात चोरी करण्यासाठी आलेल्या आरोपीने त्याच्यावर आणि त्याच्या घरातील एका आयावर हल्ला केला. ज्यानंतर तो तिथून पळून गेला. या आरोपीला रविवारी (ता. 19 जानेवारी) पहाटे अटक करण्यात आली. या घटनेनंतर आरोपीला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपी मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्यानंतर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. (Saif Ali Khan Attacked accused give information to Police how he is entered in House)
आरोपी मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो काही दिवसांपूर्वी वांद्रे इथल्या एका हॉटेलमध्ये काम करू लागला होता. शिफ्ट संपल्यानंतर तो या परिसरात पायी चालायचा. अशातच एकेदिवशी तो सैफच्या घराजवळ पोहोचला होता. सैफच्या इमारतीच्या मागच्या बाजूला कोणताच सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तो पार्किंग एरियाच्या रस्त्याने फायर एग्झिटजवळ पोहोचला आणि तिथून तो जिने चढून अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचला. तिथे गेल्यानंतर तो डक्ट एरियाद्वारे थेट सैफ अली खानच्या मुलाच्या खोलीतील बाथरुममध्ये शिरला. या घटनेत केलेला गुन्हा आरोपीने कबुल केला असून त्याने “होय, मीच हल्ला केला” असे म्हटले आहे.
हेही वाचा… Jalgaon Crime : जळगावात सैराटची पुनरावृत्ती, पाच वर्षांच्या संसारानंतर जावयाची हत्या
आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो चोरीच्याच उद्देशाने सैफच्या घरात गेला होता. पण जेव्हा घरात गोंधळ निर्माण झाला, तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने सैफवर हल्ला केला. आरोपी खरे बोलतोय की खोटे हे सिद्ध करण्यासाठी पोलीस त्याला क्राइम सीनवर घेऊन जाऊन सीन रिक्रिएट करतील. महत्त्वाची बाब म्हणजे, सैफवर हल्ला करणारा आरोपी गेल्या वर्षी वरळी कोळीवाड्यातील पबमध्ये कामाला होता. त्यावेळीही त्याने एका ग्राहकाची हिऱ्याची अंगठी चोरली होती. याप्रकरणात आरोपी शरीफुल ऊर्फ दासचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्याला कामावरून काढून टाकण्यातथ आल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीने दिली.