HomeमहामुंबईमुंबईShambhuraj Desai : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पोलीस - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पोलीस – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Subscribe

– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त्यांना विरोध असताना पर्यटन विभागाने आता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी तत्वावर पोलीस नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सेवानिवृत्त पोलिसांची नियुक्ती केली जाणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी (29 जानेवारी) या संदर्भातील माहिती दिली. निवृत्त पोलिसांना पर्यटन पोलीस म्हणून नेमण्याचा विभागाचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. (Shambhuraj Desai Tourism Minister appoints contract police for tourist safety)

हेही वाचा : Revenue Minister Orders : जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना द्याव्या लागणार गाव भेटी 

मंत्रालयात बुधवारी कराड तालुक्यातील पाल येथील ‘ब’ वर्ग देवस्थान येथे भाविक आणि पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एकात्मिक धार्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत तसेच ‘पर्यटन पोलीस’ या विषयासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना देसाई यांनी राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलीसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पर्यटन पोलीस पदासाठी सेवानिवृत्त पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि इतर संस्थेमार्फत नेमणूक करण्यात येईल. त्यासाठी महाबळेश्वर येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र पर्यटन महोत्सवात’ प्रायोगिक तत्वावर 50 पर्यटन पोलिसांना विशेष प्रशिक्षण देऊन नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने आणि मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करावी, असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले. पर्यटन पोलीस हे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी तसेच शाश्वत पर्यटनच्या सवंर्धनासाठी प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Mumbai : मुंबई वाहतूक कोंडींवर पर्याय, 5 वर्षात जलवाहतूक वाढवणार तर बीकेसीत पॉड टॅक्सी सुरू होणार 

पाल हे ‘ब’ वर्गाचे देवस्थान आहे. या देवस्थानाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘पाल’ देवस्थानाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले.


Edited by Abhijeet Jadhav