HomeमहामुंबईShiv Sena UBT : घोटाळा-टोणा' करुन 76 लाख मतदान वाढवले; शिवसेना ठाकरे...

Shiv Sena UBT : घोटाळा-टोणा’ करुन 76 लाख मतदान वाढवले; शिवसेना ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला टोला

Subscribe

मुंबई – विधानसभा निडणुकीत 76 लाख मतदान कसे वाढले, याचे पुरावे दोन आठवड्यांत सादर करण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्या आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाने ‘दाल में जरूर कुछ काला है’ असे म्हणत आयोगाला टोला लगावला आहे. त्यासोबतच पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यात न जाण्याचे ठरवले आहे, त्याच प्रमाणे काहीतरी ‘घोटाळा-टोणा’ करुन 76 लाख मतदान वाढवले आणि सत्ता मिळवली हे स्पष्ट दिसत आहे, असा आरोप महायुती सरकारवर ठाकरे गटाने केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी 237 जागा मिळाल्या. मात्र पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा सफाया झाला होता. अवघ्या पाच महिन्यात महायुतीला एवढे मोठे यश कसे काय मिळाले, याचे आश्चर्य विरोधकांसोबत सामान्य माणसालाही वाटत आहे. निवडणूक आयोगाच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढले. या वाढीव मतांचा बाप कोण असा सवाल, शिवसेना ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या ‘कोर्टाचा बाणा टिकेल का?’ अग्रलेखातून विचारला आहे.

“महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल हे एक गहन रहस्यच बनले आहे. हे असे घडलेच कसे? हा प्रश्न आता मुंबई हायकोर्टालाही पडला असून कोर्टाने निवडणूक आयोगाकडे तशी विचारणा केली आहे. 76 लाख वाढीव मतांचा घोटाळा झालाच आहे ही श्रद्धा आहे व ‘वर्षा’ बंगल्यात गुवाहाटीतून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगे पुरली आहेत ही अंधश्रद्धा आहे” असं अग्रलेखात म्हटलं आहे. “76 लाखांचे मतदान कसे वाढले याचे पुरावे दोन आठवड्यांत सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला दिल्याने ‘दाल में जरूर कुछ काला है’ याबाबतचा संशय घट्ट होत आहे” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

कोर्टाचा हा बाणा टिकेल का?

“सायंकाळी सहा वाजल्यानंतरच्या मतदानाचे व्हिडीओ द्यावेत व मतदानाच्या स्लिपचा रेकॉर्डही सादर करावा. अर्थात निवडणूक आयोग हायकोर्टाचा आदेश पाळणार आहे काय? आम्हाला तरी शंकाच वाटते. हरयाणातही अशाच वाढीव संशयास्पद मतदानाचा मुद्दा पंजाब हायकोर्टात गेला व त्या कोर्टानेही ही अशी माहिती मागवताच गृहमंत्रालयाने हस्तक्षेप केला व हायकोर्टाला ही माहिती देण्यास मज्जाव केला. त्यामुळे पंजाब हायकोर्टाची मेहनत पाण्यात गेली” असं सांगत शिवसेनेने कोर्टाचा हा बाणा टिकेल का? असाही सवाल केला आहे.

हेही वाचा : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला गैरहजर छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; म्हणाले…