मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पातून 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जनतेला किती भरभरुन दिले असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पातून फक्त पन्नासेक लाख लोकांना नव्या कर प्रणालीचा फायदा होणार असल्याचे गणितच शिवसेना ठाकरे गटाने मांडले. आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या मधाळलेली सुरी! अग्रलेखातून केंद्रीय अर्थसंकल्प कसा फसवा आणि खोटा आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. याचे गणितच ठाकरेगटाने मांडले आहे.
ठाकरे गटाने आकडेवारीने उघड केले सत्य
निर्मला सीतारामन यांना ‘खडूस’ बाई म्हणत अग्रलेखात म्हटले आहे की, निर्मला सीतारामन या ‘खडूस’ बाईने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अद्यापही भक्तांचे टाळ्या वाजवणे संपलेले नाही. जणू काही सामान्य जनता व मध्यमवर्गीयांच्या घरावर सोन्याची कौलेच चढणार आहेत अशा पद्धतीचा गाजावाजा सुरू झाला आहे’, असा टोला ठाकरे गटानं लगावला आहे.
‘मुळात देशात किती लोक इन्कम टॅक्स भरतात? तर साधारण साडेतीन कोटी लोक. त्यातील दोन कोटी लोकांचे उत्पन्न सात लाखांपेक्षा कमी आहे. म्हणजे त्यांना आधीच सूट मिळाली आहे. दीड कोटीत फार तर 80-85 लाख हे पगारदार किंवा नोकरदार असतील. त्यातील 50 लाख लोकांचे पगार 12 लाखांच्या आसपास आहेत. मग उरले किती? तर साठेक लाख. म्हणजे नव्या कर प्रणालीचा फायदा फार तर पन्नासेक लाख लोकांना होईल, पण ढोल असे वाजवले जात आहेत की, 45 कोटी लोकांना फायदा होणार आहे’, असे रोखठोक गणित ठाकरे गटाने मानले आहे.
सामान्य कुवतीच्या महिलेने सामान्य बुद्धिमत्तेच्या सरकारसाठी…
हे बजेट काही असाधारण वगैरे नाही. सामान्य कुवतीच्या महिलेने सामान्य बुद्धिमत्तेच्या सरकारसाठी तयार केलेले हे राजकीय बजेट आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी मोदी-शहांनी आधीच फुकटच्या रेवड्या वाटल्या आहेत. बिहारातदेखील निवडणुका तोंडावर असल्याने पैसा आणि योजनांचा पाऊस बिहारवर पडला. त्यामुळे नेहमीप्रमाणे हे बजेट निवडणूकप्रधान आहे. ते काही देशासाठी वगैरे नाही’, अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.
…त्यास काय महिला वर्गाचा विकास म्हणायचा?
महिला मोफत रेशनच्या रांगेत उभ्या आहेत. महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, अशा राज्यांत लाडक्या बहिणींना महिन्याला हजार- पंधराशेचे आमिष दाखवून त्यांना खूश केले जात असेल तर त्यास काय महिला वर्गाचा विकास म्हणायचा? अशी टीका सरकारच्या योजनेवर केली आहे.
वांझ अर्थसंकल्प
सुरीला मध फासून गळा कापण्यात हे लोक पटाईत आहेत. मध्यमवर्गीयांच्या कत्तलीस आता लवकरच सुरुवात होईल. हा आमचा दावा नसून मोदी सरकारची पावले त्याच दिशेने पडत आहेत. हिंदुस्थानवर कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे व देश चालविण्यासाठी नवे कर्ज घेण्याचा सपाटा सुरू आहे. या अर्थसंकल्पामुळे महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नाही. मग हा असला वांझ अर्थसंकल्प काय कामाचा?’ असा रोखठोक सवाल शिवसेना ठाकरे गटाने अर्थसंकल्पावर केला.
हेही वाचा : Raut Vs Rane : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावरही काळीजादू केली जाते का? राऊत-राणेंचे आरोप-प्रत्यारोप