HomeमहामुंबईSanjay Raut : फडणवीसांचे कुटुंब वर्षा बंगल्यात जायला घाबरते का? राऊतांनी का...

Sanjay Raut : फडणवीसांचे कुटुंब वर्षा बंगल्यात जायला घाबरते का? राऊतांनी का केला असा सवाल

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला एक दिवस तरी ‘वर्षा’वर राहायला जाण्याची इच्छा असते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पुढील दोन दिवसांत दोन महिने होतील. मात्र अजुनही देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का गेले नाहीत? फडणवीसांचे कुटुंब वर्षा बंगल्यात जायला घाबरते का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरही वर्षा निवासस्थानी राहायला जात नसल्यावरुन ठाकरे गटाने पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंब मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे राहाण्यासाठी जात नसल्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी यासंबंधीचा सवाल केला आहे.

मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे राहायला गेलेले नाही. ते ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर रहायला का जात नाही, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला होता. आज पुन्हा एकदा त्यांनी हाच सवाल केला आहे. आज माध्यमांसोबत बोलत असताना राऊतांनी काळीजादूचा उल्लेख टाळत फडणवीसांचे कुटुंब वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी घाबरत आहे का? याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावे असे म्हटले आहे.

तिकडे काय घडलं की घडवलं गेलं?

संजय राऊत म्हणाले की, वर्षा हा मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला आहे. तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेले नाही. तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही. तुम्हाला कसली भीती वाटते, काय तिकडे असं घडलं? का आधी घडवलंय? हा महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे. मुख्यमंत्री फडणवीस वर्षावर जायलाय घाबरत आहेत. ते का घाबरत आहेत, याचा शोध केंद्रीय गृहमंत्रालयानेच लावला पाहिजे.

वर्षा बंगल्याची प्रतिष्ठा का गेली?

वर्षा निवासस्थानाची प्रतिष्ठा गेली आहे का, असा सवाल त्यांना केला असता संजय राऊत म्हणाले, “प्रतिष्ठा का गेली? मुख्यमंत्री पद आणि वर्षा बंगला… लोकं वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात. लोकांच स्वप्न असतं की मी मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यावर जावं. पण हे प्रथमच आम्ही पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय वर्षा बंगल्यावर पडत नाही. आमच्या अमृता वहिणींना वर्षा बंगल्यावर जावसं वाटत नाही.”

मुख्यमंत्र्यांना कोणती अनामिक भीती?

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंब जात नाही, यामागे काही अनामिक भीती आहे का, असा सवाल करत खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाला वर्षा बंगल्यावर जावसं का वाटत नाही? मुख्यमंत्री निवासस्थान बदलायचं चाललयं. असं काय घडलंय, की एका अनामिक भीतीमुळे मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला पाडून नव्याने बांधण्याची तयारी सुरु आहे. संपूर्ण खोदकाम करुन तो बंगला पाडून नव्याने उभं करण्याचं काही तरी चाललं आहे,” अशी माझ्याकडे माहिती असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

नवीन मुख्यमंत्री राहण्यासाठी जातात तेव्हा बंगल्याची रंगरंगोटी, छोटीशी पूजा, वास्तूशांती केली जाते. त्यासाठी जेवढा वेळ लागले तेवढाच वेळ कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अधिकृत निवासस्थानी जाण्यासाठी लागतो, असे एका प्रश्नाच्या उत्तरात संजय राऊत म्हणाले. तसेच त्यांनी पूर्वीचे मुख्यमंत्री निवाससस्थान हायमाऊंट पाडून तिथे सह्याद्री अतिथीगृह बांधण्यात आल्यानंतरचा किस्साही सांगितला. ते म्हणाले की, “पूर्वीचे मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान पाडून तिथे भव्य सह्याद्री अतिथीगृह बांधण्यात आले. तेव्हाही देशभरातील पंडित, महाराज आणून पूजा करण्यात आली आणि ती इमारत उभी राहिली.”

पुरोगामी महाराष्ट्राने असं कधी पाहिलं नाही! 

खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हे असे राज्य आहे जे कायम अंधश्रद्धे विरोधात लढत आले आहे. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्राने कायम एक पाऊल पुढे टाकलेले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. येथे अंधश्रद्धा चालत नाही, आम्ही पुरोगामी लोक आहोत. मात्र राजकारणात अचानक ही अंधश्रद्धा आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून या गोष्टींची चर्चा सुरु झाली आहे. ते कामाख्याला गेले, तिथे काहीतरी कापले, बळी दिला, रक्त वाहिले, या गोष्टी एकनाथ शिंदे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाल्यापासून सुरु झाल्या.

एक चित्रपट आला होता, ‘दोन गज जमीन के निचे’. दो गज जमीन के निचे काय-काय गाडले गेले आहे, याचे रहस्य समोर आले पाहिजे. राम गोपाल वर्माने वर्षा बंगल्यावरही जायला पाहिजे. त्याच्यावरही त्याने चित्रपट तयार केला पाहिजे, असा टोमणाही राऊतांनी मारला. फडणवीसांनाही जमीनीखाली काय आहे, हे शोधायचे आहे. म्हणूनच त्यांनी खोदकाम सुरु केले का? असा सवालही राऊतांनी केला. मात्र महाराष्ट्राने असे कधी पाहिले नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Raut Vs Rane : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावरही काळीजादू केली जाते का? राऊत-राणेंचे आरोप-प्रत्यारोप