मुंबई : राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरात गेल्या काही महिन्यांपासून ड्रेसकोड लागू करण्यात आले आहे. देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना सर्वांचे अंग झाकलेले असावे, असा त्यामागील शुद्ध हेतू आहे. पण बऱ्याचदा अनेक भक्त आक्षेपार्ह असे पेहराव करून येतात, ज्यामुळे मंदिरात येणाऱ्या अन्य भाविकांकडून संताप व्यक्त करण्यात येतो. त्याचमुळे महाराष्ट्रात तुळजाभवानी मंदिर, सप्तश्रृंगी मंदिर, सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिर या ठिकाणी काही वर्षांपासून ड्रेसकोड लागू करण्यात आलेला आहे. अशातच आता मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्यात आलेला आहे. आज मंगळवारी (ता. 28 जानेवारी) मंदिर न्यासाकडून याबाबतचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Siddhivinayak Temple Dress Code enforced from February 2025)
ड्रेसकोड संदर्भातलं सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे, तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. सिद्धिविनायक मंदिरातील प्रवेशासाठीचा हा ड्रेसकोड पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली आहे. सिद्धिविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरत आहे, अशा तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या. त्यामुळेच सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनीही त्यापद्धतीचे मत मांडले होते. या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा… kolipura village : ना वीज, ना मोबाईल नेटवर्क; ‘या’ गावातील तरुणमंडळी बिनलग्नाची
सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा. जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा. यापुढे समोरच्याला संकोच वाटेल, असा पेहराव असेल त्यांना न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी, असे ट्रस्टकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मंदिरात येणाऱ्या लोकांना इतर लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल असे कपडे घालून येण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे, असेही ट्रस्टच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्येच एकमताने हा निर्णय घेण्यात आला. जे पुरुष किंवा महिला भाविक तोकड्या कपड्यांमध्ये सिद्धिविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या महिला किंवा मुली ज्या शॉर्ट्स कपड्यांमध्ये येणार, त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे मंदिर न्यासाने पत्रात म्हटले आहे.