मुंबई : सध्या महायुतीमध्ये अनेक मतभेद पाहायला मिळत आहेत. एकीकडे पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये वाद सुरू असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आता भाजपने त्यांना आव्हान देण्याची तयारी केली आहे का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. राज्याचे मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता विविध चर्चांना उधाण आले आहे. अशामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील गणेश नाईक यांचे समर्थन केले आहे. “भाजपसोबतच शिवसेनेच्या सदस्यांनीही जनता दरबार घेतला पाहिजे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटतील आणि जनतेचे भले होईल,” असे विधान त्यांनी केले. (Thane Chandrashekhar Bawankule BJP on Ganesh Naik Janta Darbar)
हेही वाचा : Ganesh Naik : ‘ओन्ली कमळ’, शिंदेंच्या ठाण्यात भाजपकडून शिवसेनेला आव्हान? गणेश नाईक घेणार जनता दरबार
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी ही राज्यातील अनेक भागांमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही सदस्यांनी असे जनता दरबार घेतले पाहिजे. महायुतीतील सर्व सदस्यांनी अशा पद्धतीने जनता दरबार घेतल्यास त्याचा फायदा हा जनतेलाच होणार आहे. समजा शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या चार मंत्र्यांनी एखाद्या जिल्ह्यात जाऊन चार आदेश पारित केले तर त्यातून जनतेचेच भले होणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना याबाबत मुभा असून कोणताही मंत्री हा जिल्ह्याचा नव्हे तर राज्याचा असतो. त्यामुळे तो कोणत्याही जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊ शकतो.” असे विधान करत त्यांनी मंत्री गणेश नाईक यांच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.
शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई या चर्चांवर म्हणाले की, “ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. गणेश नाईक भाजपचे नेते असून मंत्रीही आहेत. तसेच, नवी मुंबई हे ठाणे जिल्ह्यात आहे. मीसुद्धा पालकमंत्री म्हणून ठाण्यात काम केले असून ठाण्याचे अनेक प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी सोडवले आहेत. ज्याने त्याने आपल्या पक्षाचे काम करायला हवे, यात दुमत नाही. पण ठाणे जिल्हा हा आनंद दिघेंनी 25 ते 30 वर्षांपासून तसेच त्यानंतर एकनाथ शिंदेनी हा किल्ला भक्कम ठेवायचे काम केले आहे.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.