मुंबई : राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूम येथे गेल्या महिन्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. या बैठकीत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. अशातच मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरांचे हस्तांतरण मार्च महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील एका इंग्रंजी वृत्रपत्रात माहिती देण्यात आली आहे. (The first phase of houses from the Worli BDD Chawl redevelopment project is likely to be delivered in March)
मुंबईतील वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि शिवडीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या नेतृत्त्वात आणि राज्य सरकारच्या पाठिंब्याने करण्यात येत आहे. मुंबईत सध्या 207 बीडीडी चाळी असून यापैकी वरळीत 121 , नायगावमध्ये 42, ना.म. जोशी मार्ग 32 आणि शिवडीत 12 चाळी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यावेळी या चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रकल्पाचे अंदाजित मूल्य 16 हजार कोटी रुपये होते. या प्रकल्पाचे पहिले भूमिपूजन एप्रिल 2017 मध्ये झाले होते. बीडीडी चाळीतील 160 स्क्वेअर फुटांच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना 500 स्क्वेअर फुटांचे घर दिले जाणार आहे.
हेही वाचा – Shiv Sena : 2024 नंतरही मुख्यमंत्री राहणार या आश्वसानामुळेच एकनाथ शिंदे फुटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
वरळीत पहिल्या टप्प्यात 5198 घरांची निर्मिती केली जाणार आहे. या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारत क्रमांक 1 च्या डी आणि ई विंगमील 556 घरांच्या चाव्या पात्र रहिवाशांना मार्च 2025 पर्यंत दिल्या जाणार असल्याचे समजते. यानंतर उपलब्ध होणाऱ्या जागेत म्हाडा 1860 घरे मध्यमवर्ग उत्पन्न गटासाठी, तर 1036 घरे उच्च उत्पन्न गटासाठी बांधणार आहे. या घरांची विक्री लॉटरीद्वारे होणार आहे. यानंतर वरळी येथील पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात 3974 घरांची निर्मीती केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात म्हाडाला 2184 घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यात 1494 मध्यम उत्पन्न गटासाठी, तर 1036 उच्च उत्पन गटासाठी असणार आहेत.
ब्रिटीश सरकारकडून बीडीडी चाळीची निर्मिती
दरम्यान, ब्रिटीश सरकारकडून 1920 ते 1925 च्या दरम्यान बीडीडी चाळी बांधण्यात आल्या होत्या. बीडीडीचे पूर्ण नाव बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असे आहे. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने येणाऱ्या कामगारांच्या आणि स्थलांतरितांच्या निवासाच्या सोयीसाठी बीडीडी चाळीची बांधणी करण्यात आली होती. त्यानंतर गिरणी कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी या चाळी महत्त्वाच्या ठरल्या होत्या. यानंतर आता या चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पानंतर म्हाडाकडून ऑगस्ट 2021 मध्ये वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे कामाला सुरुवात करण्यात आली होती. वाढत्या महागाईमुळे आता बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी अंदाजित 20 हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. बीडीडी चाळीनंतर सध्या वरळीसह नायगाव फेज 1 चे बांधकाम सुरू आहे. तर ना.म. जोशी मार्ग येथे 10 बीडीडी चाळींचे पाडकाम करण्यात आले आहे. याशिवाय शिवडीतमध्ये जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथेही कामाला सुरुवात होणार आहे.