मुंबई (मारुती मोरे) : मुंबई महापालिकेने गोरेगाव येथील टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. मात्र 2018 मध्ये स्थायी समितीला याच कामाबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी प्रस्तावात दिलेली माहिती आणि आता काम चालू असताना त्याच्या अंतर्गत होणारे विकास काम यात मोठी तफावत झाल्याचे निदर्शनास येते. (The type of hat worn in the redevelopment work of Topiwala Mandai)
पूर्वीच्या प्रस्तावात मंडईची इमारत 18 मजली, खर्च 151.73 कोटी रुपये, एकूण क्षेत्रफळ 4,401 चौ. मीटर तर नाट्यगृहात आसन क्षमता 867 एवढी होती. मात्र आता काम सुरू असताना नवीन प्रस्तावानुसार, इमारत दोन मजले घटून 16 मजली झाली आहे. तर खर्च 202 कोटींवर गेला असून क्षेत्रफळ सुद्धा घटून 3,438 चौ. मीटर झाले आहे. त्याचप्रमाणे, नाट्यगृहाची आसन क्षमता 67 ने घटून 800 झाली आहे.
2018 मध्ये जेव्हा टोपीवाला मंडईच्या पुनर्विकास कामाबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीला मंजुरीसाठी आला होता त्याचवेळी सदर मंडईचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले होते, तो पालिकेने काळया यादीत टाकलेल्या कंत्राटदाराचा साथीदार निघाल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्यात येऊन दुसऱ्या कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे टोपीवाला मंडईच्या पुनर्विकास कमाबाबतचा 2018 मधील प्रस्ताव, त्यामधील माहिती आणि आता नव्याने पुनर्विकास काम सुरू केल्यावर पुनर्विकास कामाबाबतची समोर आलेली माहिती पाहता ‘टोपीवाला मंडई’ च्या कामाच्या अंतर्गत मुंबईकरांना ‘टोपी’ घालण्याचा प्रकार सुरू आहे की काय ? असा सवाल मुंबईकरांकडून उपस्थित करण्यात येत असून त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याचपार्श्वभूमीवर गोरेगाव पश्चिम येथील प्रस्तावित टोपीवाला महापालिका मंडईला महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज भेट देत बांधकामाची पाहणी केली.
हेही वाचा – Western Express : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक वेगवान आणि सुरळीत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
भूषण गगराणी म्हणाले की, टोपीवाला महापालिका मंडईचा पुनर्विकास महापालिकेने हाती घेतला आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील मौजे पहाडी गोरेगाव येथे उभारण्यात येणारी ही इमारत 16 मजली आहे. या इमारतीत 800 आसन क्षमतेच्या सुसज्ज नाट्यगृहाचा समावेश आहे. मंडईत एकूण 206 गाळे असतील. त्यात तळ मजल्यावर 112 गाळे आणि पहिल्या मजल्यावर 94 गाळ्यांचा समावेश आहे. याचबरोबर इमारतीत एकूण 53 रहिवासी सदनिकांची तरतूद करण्यात आली आहे. तर, 192 वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध असेल. छतावर मनोरंजन सुविधा आणि खेळासाठी जागा आरक्षित आहे.
या इमारतीचा पुनर्विकास 30 महिन्यांच्या कालावधीत करण्याचे नियोजित आहेत. सुमारे 3 हजार 438 चौरस मीटर क्षेत्रफळावर आकर्षक अशी ही इमारत उभारण्यात येत आहे. गाळेधारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी इमारतीची बांधकाम प्रक्रिया वेगाने करावी. येत्या वर्षभरात ही जागा वापरासाठी यावी म्हणून प्रकल्पाशी संबंधित बाबींची अंमलबजावणी करावी. गाळेधारकांना दिलासा म्हणून पुनर्वसनाच्या अनुषंगाने सुरूवातीच्या टप्प्यात दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण करावे, जेणेकरून गाळेधारकांना ही जागा व्यवसायासाठी वापरणे शक्य होईल, असेही भूषण गगराणी यांनी सांगितले.
हेही वाचा – Siddhartha Hospital : सिद्धार्थ रुग्णालयाच्या कामाला गती द्यावी, आयुक्तांचे निर्देश