HomeमहामुंबईमुंबईWalmik Karad : बीड प्रकरणाची ईडीने चौकशी करावी, मनी लाँड्रिंगचाही प्रकार; आरटीआय...

Walmik Karad : बीड प्रकरणाची ईडीने चौकशी करावी, मनी लाँड्रिंगचाही प्रकार; आरटीआय कार्यकर्त्याची याचिका

Subscribe

मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा पाय अधिक खोलात जात आहे. कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी दिलेली कागदपत्र अजित पवारांनी एसआयटीला दिली आहेत. तर दुसरीकडे प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. बीड प्रकरणात कॅबिनेट मंत्र्याचे नाव समोर येत असल्यामुळे पोलिस तपासाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे ईडीने चौकशी करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

ईडीने स्वतंत्र चौकशी करावी

बीड हत्याकांड आणि अवादा एनर्जी कंपनी खंडणी प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी आणि सीआयडीच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासोबत निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही करण्यात येणार आहे. पण या प्रकरणामध्ये कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलिस तपासात अडथळा आणि मर्यादा येत आहे. असा दावा केतन तिरोडकर यांनी केला आहे. त्यामुळे ईडीने स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. मनी  लॉंड्रिंगच्या दिशेनेही या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी तिरोडकर यांनी केली आहे.

धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते, असा दावा अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर सोमवारी केला होता. अशाच प्रकारची मागणी आरटीआय कार्यकर्ते तिरोडकर यांनीही केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या संबंधित अनेक कंपन्यांचे व्यवहार, मालमत्तांची यादी समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाात निवडणूक आयोगाला प्रतिवादी करावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली असून त्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.