मुंबई : मीरा भाईंदरमधील मीरारोड येथे सोमवारी (19 फेब्रुवारी) एमआयएम नेते माजी आमदार वारिस हे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी व पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी येणार होते. परंतु शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी व मीरा भाईंदर पोलिसांनी पठाण यांना शहरात येण्यास विरोध केला. पोलिसांनी पठाण यांना दहिसर चेकनाका येथे अडवून तुम्ही मीरा भाईंदर शहरात आल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे तुम्ही परत जा असे सांगितले. त्यावेळी पठाण हे विरोध करत काहीवेळ रस्त्यावर बसले त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दहिसर पोलीस ठाणे येथे घेऊन गेले. (Waris Pathan MIM leader Waris Pathan in police custody What exactly is the case)
अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला त्यावेळी मीरा भाईंदर शहरात दोन समाजात तेढ निर्माण झाली होती. सध्या ते प्रकरण शांत झाले आहे. त्यानंतर आता शहरात बाहेरून राजकीय नेते येऊन वादग्रस्त विधान करत आहेत. यामुळे पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाहेरील नेत्यास शहरात प्रवेश दिला जात नाही. असे असताना वारिस पठाण यांनी मीरा भाईंदर शहरात आज काही राजकीय नेते भडकावू भाषण देत असल्याचे सांगत मीरा भाईंदर शहरातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी व पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी सोमवारी आले होते. परंतु पोलिसांनी याची दखल घेत माजी आमदार वारिस पठाण यांना मीरा भाईंदर शहरात येत असताना आज दुपारी 2 वाजता दहिसर चेक नाक्याजवळ थांबवून ताब्यात घेत पुन्हा माघारी पाठवले आहे.
हेही वाचा : Muslim Reservation : मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्या; आमदार रईस शेख यांची मागणी
काय म्हणाले वारिस पठाण?
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एमआयएमचे नेते वारिस पठाण म्हणाले की, मी पोलीस आयुक्तांना भेटून द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांविरोधात निवेदन देणार होतो. परंतु मला पोलिसांनी येथे थांबवून संविधानाचे उल्लंघन केले आहे. हे चुकीचे असल्याचे वारिस पठाण यांनी सांगितले.
हेही वाचा : Vikhe Vs Thorat : थोरातांनी विखेंचा केला ‘धंदेवाईक राजकारणी’ उल्लेख; विखे म्हणाले- ते रात्रीला…
आधीच बजावली होती पोलिसांनी नोटीस
माजी आमदार वारीस पठाण हे मीरा रोड येथील प्रकरणावरुन निवेदन पोलीस आयुक्तांना देणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला चेक पॉइंटवरुन ताब्यात घेतले आहे. यादरम्यान कालच म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांनी वारिस पठाण यांना कलम 149 ची नोटीस बजावली होती.