मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावात पुढील सात महिने म्हणजेच २६ ऑगस्ट २०२५पर्यंत पुरेल इतका (२१० दिवसांचा) पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर तलावात एकूण क्षमतेच्या १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक असला तरी ही बाब वगळता भातसा, अप्पर वैतरणा आदी तलावात जास्त तर इतर तलावात तलावात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना आगामी पावसाळ्यापर्यंत दैनंदिन पाणीपुरवठ्याबाबत टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही, मात्र अधूनमधून जलवाहिनी फुटण्याच्या घटना व त्यामुळे होणाऱ्या लाखो लिटर पाण्याची नासाडी पाहता शक्यतो उपलब्ध पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करणेही गरजेचे आहे. (Water storage for the next seven months in the lake that supplies water to Mumbai)
मुंबई महापालिका मुंबईतील कमी क्षमता असलेल्या विहार आणि तुळशी तलावाच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्हा परिसरातील भातसा, अप्पर वैतरणा, मध्या वैतरणा, तानसा आणि मोडक सागर या पाच तलावांतून असे एकूण सात तलावातून दररोज मुंबईसाठी ४ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, मुंबई महापालिकेला ठाणे जिल्हा परिसरातील प्रमुख पाच तलावातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे हे सामाजिक भान राखून मुंबई महापालिका ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ११५ दशलक्ष लिटर, भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात दररोज ४५ दशलक्ष लिटर आणि सदर प्रमुख तलाव क्षेत्रातील खेडेगावांना दररोज २० दशलक्ष लिटर ( प्रक्रिया न केलेले पाणी) असे एकूण १८० दशलक्ष लिटर पाणी ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्रात पुरवते. त्यामुळे मुंबईला दररोज होणारा ४ हजार दशलक्ष लिटर आणि ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्रात होणारा दैनंदिन १८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता मुंबई आणि ठाणे, भिवंडी महापालिका यांना दररोज ४,१८० दशलक्ष लिटर इतका पाजीपुरवठ करण्यात येत आहे.
हेही वाचा – Mumbai : मुंबई वाहतूक कोंडींवर पर्याय, 5 वर्षात जलवाहतूक वाढवणार तर बीकेसीत पॉड टॅक्सी सुरू होणार
विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावात ६ टक्के पाणीसाठा अधिक प्रमाणत उपलब्ध आहे. मुंबईला संपूर्ण वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असते. मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी सात तलावात पडलेल्या पावसामुळे जमा झालेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेते. त्यानुसार वर्षभरासाठी आवश्यक १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा सात तलावात जमा नसल्यास महापालिकेला दैनंदिन पाणी पुरवठ्यात किमान ५-१० टक्के तर कधी कधी २५-३० टक्के पर्यंत पाणीकपात करावी लागते. त्याचप्रमाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या जुन्या असल्याने त्या कधी कधी अधूनमधून अचानकपणे फुटतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणत पिण्याचे पाणी वाया जाते. तसेच, जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करताना अनधिकृतपणे पाण्याची चोरी होते. या सर्व बाबींचा विचार करून महापालिकेला दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे गणित करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे आव्हानात्मक बाब असते.
हेही वाचा – Mumbai Bike Taxi : मुंबईत परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी, पण ही काळजी घेण्याच्या सूचना
आतापर्यंतची सात तलावातील पाणीसाठ्याबाबत माहिती
तलाव पाणीसाठा द.लि तलावातील पाणीसाठा टक्केवारी
- अप्पर वैतरणा – २,१३,५४६ ९४.०५
- मोडक सागर – १९,९९७ १५.५१
- तानसा – ७९,७१७ ५४.९५
- मध्य वैतरणा १,०५,४९६ ५४.५१
- भातसा – ४,४१,२९७ ६१.५४
- विहार – १८,५५१ ६६.९७
- तुळशी – ५,०५९ ६२.८८
——————————————————–
सन २०२५ – ८,८३,६६२ ६१.०५%
सन २०२४ – ७,९९,१४७ ५५.२१%
सन २०२३ – ८,७५,४५७ ६०.४९%