HomeमहामुंबईमुंबईWestern Express : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक वेगवान आणि सुरळीत करण्याचे महापालिका...

Western Express : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक वेगवान आणि सुरळीत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Subscribe

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची समस्या भेडसावत असल्याने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी (ता. 23 जानेवारी) स्वतः भेट देऊन वाहतुकीची पाहणी केली. यावेळी त्यांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठीचे निर्देश दिले.

मुंबई (मारुती मोरे) : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि वेगवान होण्यासाठी मुंबई महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मेट्रो, वाहतूक पोलीस यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. रस्त्याची गुणवत्ता अधिक चांगली करावी. पावसाळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. दुतगती महामार्गावरील रस्ते दुभाजक, पदपथ सुस्थितीत ठेवावेत व त्यामध्ये एकसमानपणा येण्यासाठी रस्ते विभागाने धोरण तयार करावे, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी सराव यंत्रणांना दिले आहेत. (Western Express Municipal Commissioner Bhusham Gagrani order to speed up and smooth traffic)

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची समस्या भेडसावत असल्याने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी (ता. 23 जानेवारी) स्वतः भेट देऊन वाहतुकीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या के/पूर्व विभागात बैठक घेतली. यावेळी, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे , पोलीस उपआयुक्त (वाहतूक) मितेश घट्टे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, उप आयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त (के/पूर्व) मनीष वळंजू, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा… Siddhartha Hospital : रूग्णालयाच्या कामाला गती द्यावी, आयुक्तांचे निर्देश 

पश्चिम द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या नऊ विभाग हद्दीतून जातो. या महामार्गावरील काही उड्डाणपूल एमएसआरडीसी यांच्या अखत्यारित आहेत. हा महामार्ग मुंबई महापालिकेकडे अलीकडेच हस्तांतरित झाला आहे. या महामार्गाची देखभाल दुरुस्ती, डागडूजीची जबाबदारी महानगरपालिकेकडे आली आहे. प्रत्येक विभाग हद्दीत पदपथ, रस्ते दुभाजक, कडठे यांची रचना भिन्न स्वरूपाची आहे. त्यात एकसमानपणा यायला हवा. त्यासाठी रस्ते विभागाने धोरण तयार करावे. त्याची अंमलबजावणी विभाग कार्यालयांनी करावी, अशी सूचना भूषण गगराणी यांनी केली.

वांद्रे ते दहिसर या 25 किलोमीटर लांबीच्या महामार्गाची गुणवत्ता सुधारण्यास वाव आहे. काही ठिकाणी पृष्ठीकरण करता येईल. रस्ते दुभाजक सुस्थितीत आणि रंगकाम केलेले असावेत. आवश्यक त्या ठिकाणी एकसारखे कठडे (रेलींग) करावे, जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही. महामार्गाच्या दुतर्फा सुशोभीकरण करणे शक्य आहे का, याचा आढावा घ्यावा. रस्ते दुभाजक, पदपथांच्या दगडी कडा यांची नियमितपणे स्वच्छता करावी. रस्ते दुभाजकांना आकर्षक रंगसंगती करावी. दुभाजकांमध्ये हिरवळीची लागवड करावी. आवश्यक त्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग करावे. ही सर्व कार्यवाही विभाग स्तरावर होणे अपेक्षित आहे, असे आयुक्त भूषण गगराणी यांनी नमूद केले.

पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश

पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी आतापासूनच उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश आयुक्त गगराणी यांनी यावेळी प्रशासनाला दिले. काही ठिकाणी जोरदार पावसावेळी पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने संबंधित विभाग कार्यालय आणि रस्ते विभाग यांच्याशी समन्वय साधून तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे गरजेचे आहे. नागरिक, प्रवासी यांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. सांडपाणी वाहणाऱ्या नलिका बंदिस्त असाव्यात. त्या खुल्या असता कामा नये. महामार्गावरील ड्रेनेजची झाकणे मजबूत असावीत. महामार्गासह उड्डाणपूल, भुयारी मार्ग याठिकाणी पथदिवे सुस्थितीत असावेत. रस्ते गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी मुक्त महामार्ग होण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलीस, एमएसआरडीसी यांनी समन्वयाने कामकाज केले पाहिजे, असे भूषण गगराणी यांनी नमूद केले.