नवी मुंबई : गेल्या काही वर्षामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तरुणाईमध्ये अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुणाईला यामधून बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून अंमली पदार्थांचे अड्डे असलेल्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात येत आहेत. अशातच आता नवी मुंबई पोलिसांनी या शहराला नशा मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता नवी मुंबई पोलिसांनी “ड्रग्ज फ्री नवी मुंबई” ही मोहीम राबवली असून या मोहिमेच्या अंतर्गत बुधवारी (ता. 26 फेब्रुवारी) तब्बल 10 कोटींचे ड्रग्ज नष्ट करण्यात आले आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. (Navi Mumbai Police destroyed drugs worth 10 crores in a single day)
नवी मुंबई पोलिसांनी नशा मुक्त नवी मुंबई अभियान या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 40 गुन्ह्यांमध्ये 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या अभियानावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक याच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन मान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी (तळोजा) या ठिकाणी नष्ट करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील अधिकाऱ्यांकडून शाळा व कॉलेजमध्ये, तसेच रहिवाशी सोसायटी, रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वेळोवेळी जाऊन तेथे विद्यार्थी व नागरिकांमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परिणामाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात येत आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी ही सरकार मान्य वेस्ट डिस्पोजल कंपनी असून या कंपनीमध्ये केंद्रसरकार व राज्य सरकार यांच्या विविध विभागांचे वेगवेगळया प्रकारचे मुद्देमाल नष्ट केले जातात.
हेही वाचा… Pune Crime : कायदा-सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घ्या, सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
नवी मुंबई आयुक्तालयामध्ये 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर जवळपास 1143 गुन्हे दाखल झाले होते. यापैकी 1743 आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये जवळपास 111 आफ्रिकन नागरिकांचा समावेश होता. या आफ्रिकन नागरिकांकडून 38 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच 2023-24 वर्षामध्ये नवी मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 1131 आफ्रिकन नागरिक आणि 224 बांग्लादेशी नागरिक यांच्यावर कारवाई करण्यात आली असून जवळपास 1128 आफ्रिकन नागरिकांना भारतातून हद्दपार करण्यात आले आहे. शासनाच्या धोरणानुसार अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतुन व पुढाकाराने नशा मुक्त नवी मुंबई अभियानाची सुरुवात दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.