Homeमहामुंबईनवी मुंबईNavi Mumbai : ऐरोली नाट्यगृहात मे अखेरीस तिसरी घंटा

Navi Mumbai : ऐरोली नाट्यगृहात मे अखेरीस तिसरी घंटा

Subscribe

नवी मुंबई : ज्ञानेश्वर जाधव
वाशीतील नाट्यगृहाप्रमाणे कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली येथील नाट्य रसिकांसाठी ऐरोलीमध्ये नाट्यगृह बांधण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला. त्याचे भूमीपूजनही झाले. मात्र कंत्राटदाराची उदासीनता, भूमीपूजन नाट्याचे सोहळे व राजकीय रंगात नाट्यगृहाचे काम 12 वर्षे रखडले होते. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नाट्यगृह खुले करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली आहेत. नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मे महिन्याची डेडलाईन ठेकेदाराला देण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच नाट्यगृहाचे लोकार्पण होईल, असे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा… DCM Eknath Shinde : मुंबईकरांचे प्रशस्त घरांचे स्वप्न पूर्ण होणार, काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे?

वाशीत सिडकोने विष्णुदास भावे नाट्यगृह बांधले आहे. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता भावे नाट्यगृहाप्रमाणे ऐरोलीत सेक्टर-5 भूखंड क्रमांक-37 वर नाट्यगृह उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधीं व नाट्यप्रेमींनी लावून धरली होती. सिडकोने भूखंड दिल्यानंतर 2013 मध्ये महापालिकेने प्रशासकीय मंजुरी दिली. 2014 मध्ये नाट्यगृहाच्या उभारणीचे कंत्राट महावीर रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीला देण्यात आला. 2014-15 मध्येच नाट्यगृहाचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदाराने काम सोडून दिल्याने नाट्यगृहाचे काम रखडले. पालिकेने सहा वेळा नाट्यगृहाच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे आठ वर्षे काम रखडले. त्यानंतर 2021 मध्ये तत्कालीन आयुक्तांनी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली आणि सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीचे कामाला सुरुवात केली.

हेही वाचा…Vastu Tips : घरात शंख ठेवण्याचे आहेत नियम

2014 मध्ये गणेश नाईक यांनी नाट्यगृहाचे भूमीपूजन केले होते. त्यानंतर 2021 मध्ये भाजपात गेलेले आमदार गणेश नाईक आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसर्‍यांदा भूमिपूजन केले. त्यामुळे नाट्यगृह राजकीय वादात अडकते की काय, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर खर्‍या अर्थाने नाट्यगृहाच्या उभारणीचा श्री गणेशा झाला. आताचा आढावा घेतला असता नाट्यगृहाचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. तीन मजली वास्तूचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत कामे सुरु आहेत. अंतर्गत व बाह्य सजावटी बरोबरच वातानुकुलित यंत्रणा बसवण्यात येणार आहे. नाट्यगृहाचे काम पूर्ण होऊन ते प्रेक्षकांसाठी मे अखेरीस खुले होईल, असा विश्वास शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी व्यक्त केला आहे. ऐरोली परिसरातील नाट्यप्रेमींना वाशीतील विष्णुदास भावे किंवा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे नाटक पाहण्यासाठी जावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया जात होता. ऐरोली नाट्यगृहामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  1. शहरातील विकास प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन त्याचा नवी मुंबईकरांना वापर करता यावा यासाठी प्रत्यक्ष भेटी देऊन कामाचा आढावा घेत आहे. ऐरोली नाट्यगृहाची पाहणी केली असून मे महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊन ते रसिकांसाठी खुले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. -डॉ.कैलास शिंदे, आयुक्त-नमुंमपा.
  2. ऐरोली नाट्यगृहाचे काम मुदतीत पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. -शिरीष आरदवाद, शहर अभियंता.
  3. नाटयगृहाचे काम काही द्वेषींनी अडविले होते. माजी खासदार राजन विचारे यांनी लक्ष घालून २०२१ मध्ये नव्या ठेकेदारामार्फत काम सुरु केले. सध्या काम वेगात सुरु आहे. -एम.के.मढवी, स्थानिक माजी नगरसेवक (उबाठा)