पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथे बारावीच्या उत्तरपत्रिका सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागाकडून वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणी बोर्डाकडून नियमानुसार संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती मुंबई विभागाच्या प्रभारी विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी ‘आपलं महानगर’ला दिली.
बारावीच्या बुककीपिंग विषयाची परीक्षा 28 फेब्रुवारी रोजी झाली होती. त्याच्या 25 उत्तरपत्रिका कामोठे बस स्टॉपच्या जवळ झाडीत टाकलेल्या आढळल्या. काही कामानिमित्ताने गुरुवारी (6 मार्च) सकाळी मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल कामोठे बस स्टॉपजवळ आल्या असता एक उत्तरपत्रिका त्यांच्या पायाजवळ उडत आली. कुतुहूल म्हणून त्यांनी ती पाहिली असता ती बारावीची उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार आणि पनवेल महानगर अध्यक्ष स्वरुपा सुर्वे यांना सांगितली. त्यानंतर तिघींनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना सर्व माहिती दिली. कामोठे बस स्टॉपच्या मागे झाडात 25 उत्तरपत्रिका सापडल्या. यातील काही उत्तरपत्रिका फाटलेल्या होत्या. एका जेसीबीचालकाने काही मुलांना पेपर टाकताना पाहिले होते, अशी माहिती अदिती सोनार यांनी दिली.
कळंबोलीतील शिक्षक
कळंबोलीतील एका शिक्षकाकडे या उत्तरपत्रिका तपासायला आल्या होत्या. त्या शिक्षकाने बुधवारी (5 मार्च) कामोठे पोलीस ठाण्यात उत्तरपत्रिकेचा एक गठ्ठा (25 उत्तरपत्रिका) हरवल्याचे सांगितले होते. तसेच कुणी उत्तरपत्रिका घेऊन आल्यास आपल्याला कळवा, असेही सांगितले होते. ते तपासलेल्या उत्तरपत्रिका दुचाकीवरून मॉटरेटरकडे घेऊन जात असताना त्यांच्या पिशवीतून एक गठ्ठा पडल्याचे त्यांनी सांगितले.

बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
कामोठेमध्ये सापडलेल्या उत्तरपत्रिकांची पाहणी मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी केली. त्यानंतर त्या उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकाकडे सुपूर्द करण्यात आल्या. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात संध्याकाळी तक्रार दाखल करण्यात आली.
विद्यार्थ्यांना खात्री करावी
ज्या मुलांनी बारावीची परीक्षा दिली आहे त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात जाऊन त्यांच्या उत्तर पत्रिका सुरक्षित आहेत का, याची खात्री करावी. – अदिती सोनार, मनसे महिला अध्यक्ष, रायगड
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार याची काळजी घेतली जाईल. उत्तरपत्रिका तपासलेल्या होत्या. या प्रकरणी नियमानुसार कारवाई होईल. – ज्योत्स्ना शिंदे, प्रभारी विभागीय सचिव, मुंबई विभाग
(Edited by Avinash Chandane)