नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचा कारभार पाच वर्षांपासून प्रशासकामार्फत चालविला जात आहे. या कालावधीत नवी मुंबईकरांना भेडसावणार्या समस्या सोडविण्यात प्रशासक तथा आयुक्तांना अपयश आले आहे.त्यामुळे प्रशासनाचा निषेध करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्यांनी पालिका मुख्यालया समोर हातात फलक घेऊन घोषणाबाजी करीत निषेध केला. त्याच प्रमाणे पालिकेचे उपायुक्त शरद पवार यांनी भेट घेत निवेदन दिले.
हेही वाचा…Nana Patole : धनंजय मुंडे राजीनामा प्रकरण, काँग्रेस मुख्यमंत्र्याविरोधात हक्कभंग आणणार
काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार काँग्रेस जिल्हा प्रभारी रमेश कीर यांच्या उपस्थितीत अरविंद नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निषेध आंदोलनात प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अंकुश सोनावणे, माजी नगरसेविका पूनम पाटील, तसेच काँग्रेसचे माजी लोकप्रतिनिधी, विविध सेलचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
हेही वाचा…Thackeray Vs Modi : गरिबी, अंधश्रद्धा आणि धर्मांधता वाढवण्याचे सरकारचे धोरण, ठाकरेंचा हल्लाबोल
पालिका उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात शालेय विद्यार्थी कुमार आयुष सिंग या विद्यार्थ्याच्या मृत्यू जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करावी, प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी कारवाई थांबवावी, वाशीतील रुग्णालयात नेफरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट,न्यूरोलॉजिस्टची पदे तातडीने भरावीत, शाळेमधील रिक्त शिक्षक पदे भरावी, काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने ठेकेदारावर कारवाई करावी, सीबीडी-बेलापूर परिसरातील डोंगरावरील अतिक्रमणावर कारवाई करावी या मागण्यांची पूर्तता करण्याचे म्हटले आहे.
-
महापालिकेचे १११ प्रभाग आहेत. लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक प्रभागात समस्या कायम आहेत.प्रशासनावर कुणाचाही अकुंश नाही.त्यामुळे काँग्रेसला जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरल्याची प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस प्रभारी रमेश कीर यांनी दिली.
-
आत्ताची काँग्रेस ही कार्यालयात बसून काम करणारी नसून जनतेसाठी रस्त्यावर उतरुन काम करणारी आहे.नागरी समस्यांचे निवेदन अधिकार्यांना देण्यात आले आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास सर्वच विभाग कार्यालया बाहेर आंदोलन केले जाईल, असा इशारा अरविंद नाईक यांनी दिला.
-
पालिका आयुक्तांवर शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीचा अंकुश आहे.त्यामुळे कामकाजाचा गाढा त्यांच्याकडून हाकला जात आहे. पालिकेत सर्वाधिक प्रशासकीय कालावधी लादला गेला आहे.त्यामुळे सत्ताधार्यांनी निवडणूका जाहिर कराव्यात, अशी मागणी प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली आहे.