Homeमहामुंबईनवी मुंबईPanvel Station : पनवेल स्टेशनमध्ये बळी गेल्यावर दुसरा पादचारी पूल बांधणार का,...

Panvel Station : पनवेल स्टेशनमध्ये बळी गेल्यावर दुसरा पादचारी पूल बांधणार का, नवीन पनवेलकरांच्या जीवाशी खेळ

Subscribe

पनवेल : 29 सप्टेंबर 2017. याच दिवशी मुंबईतील एल्फिन्स्टन स्टेशनकडे जाणाऱ्या पुलावर अचानक चेंगराचेंगरी झाली. इतकी की या दुर्घटनेत तब्बल 23 जणांचा जीव गेला आणि 39 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर मुंबईतील गर्दीच्या पुलांवर रेल्वे पोलीस उभे राहू लागले. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशनात एल्फिन्स्टन स्टेशन दुर्घटनेची पुनरावृत्ती केव्हाही होऊ शकते. हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला कल्पना येईल की नवीन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना कोणत्या प्रसंगातून जावे लागते.

हेही वाचा…  Panvel problem : प्रवेशद्वाराजवळच पनवेलकरांचा जीव धोक्यात, एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा गोंधळ

हार्बर मार्गावरील पनवेल हे शेवटचे स्टेशन आहे. पनवेलचा चहुबाजूने विकास होत असल्यामुळे इकडे येणाऱ्या कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्याही प्रचंड वाढली आहे. प्रवासी वाढले असले तरी नवीन पनवेलच्या दिशेने जायला केवळ एक फूट ओव्हर ब्रिज (FOB) आहे. अनेकदा एकापाठोपाठ एक अशा गाड्या येतात आणि पनवेलहून गाडी सुटते. अशा वेळी या फूट ओव्हर ब्रिजवर चढणेही अशक्य होते. विशेषता संध्याकाळी या फूट ओव्हर ब्रिजवर एखादी दुर्घटना होऊ शकते, इतकी भीती प्रवाशांना वाटते. त्यातच कोकण रेल्वे प्रवाशांची गर्दी असल्यामुळे अचानक चेंगराचेंगरी झाल्यास अनेक प्रवाशांचे बळी जाऊ शकतात, याकडे प्रवासी लक्ष वेधत आहेत.

हेही वाचा…  Panvel Problem : याला रस्ता म्हणायचा की वाहनतळ, स्टेशन रोडवर नवीन पनवेलमध्ये वाहतुकीचा बट्ट्याबोळ

वास्तविक पनवेल स्टेशनमधून फूट ओव्हर ब्रिजवर जायला एकूण चार मार्ग आहेत. पहिला तिकीट घराकडून, दुसरा प्लॅटफॉर्मसमोर असलेला जिना, तिसरा कोकण रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून आणि चौथा त्याला लागूनच आहे. असे असले तरी नवीन पनवेलकडे जायला एकच मार्ग असल्याने या पादचारी पुलावर कधीही चेंगराचेंगरी होऊन हकनाक बळी जाऊ शकतात, अशी भीती आहे. त्यामुळे रेल्वेने भुयारी मार्ग सुरू करावा, आणखी एक पादचारी पूल बांधावा अशी मागणी होत आहे. खरे तर एवढ्या वर्षांत रेल्वेने हे का केले नाही हे मोठे कोडेच आहे. प्रवाशांचे जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत.

रेल्वे कधी उपाययोजना करणार?

पनवेल स्टेशनमधील गर्दी पाहता पुलावर कधीही चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊ शकते. विशेषता संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी. सध्या प्लॅटफॉर्मपुरता मर्यादित असलेला भुयारी मार्ग नवीन पनवेलपर्यंत वाढवावा तसेच आणखी एक पादचारी पूल बांधावा.
– दामोदर परब, प्रवासी

दोन महिन्यांत २ पूल सेवेत

रेल्वे बांधत असलेला दुसरा पादचारी पूल

सध्याच्या पुलाला लागून दुसऱ्या फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे. पण, खडक लागल्याने काम लांबले आहे. तरीही मार्चपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पनवेल स्टेशन मास्टर कृष्ण एस. अग्रवाल यांनी आपलं महानगरला दिली. शिवाय पेणच्या दिशेने आणखी एका पादचारी पुलाचे काम सुरू असून ते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 16 विचुंबे आदी भागातून येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल. शिवाय भुयारी मार्गालाही आमचे प्राधान्य आहे. मात्र, स्टेशनमध्ये सध्या काम सुरू असल्याचे भुयारी मार्गाला उशीर होऊ शकतो, याकडे अग्रवाल यांनी लक्ष वेधले.

(Edited by Avinash Chandane)