Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईनवी मुंबईPanvel News : आधुनिक हिरकणींसाठी कौतुकाचे बोल अन् टाळ्यांचा कडकडाट, पनवेलमध्ये रंगला हिरकणी महोत्सव

Panvel News : आधुनिक हिरकणींसाठी कौतुकाचे बोल अन् टाळ्यांचा कडकडाट, पनवेलमध्ये रंगला हिरकणी महोत्सव

Subscribe

पनवेल : ती जन्मदाती, ती भगिनी, ती पत्नी. महिलेची अनेक रुपे आहेत. या रुपांचं दर्शन पनवेलकरांना हिरकणी महोत्सवाच्या निमित्तानं घडलं. जागतिक महिला दिनानिमित्तानं पनवेल महापालिकेनं हिरकणी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या निमित्तानं महिलांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. बचत गट प्रदर्शन, आरोग्य शिबीर, स्वसंरक्षणाचे धडे, सायबर सुरक्षा, सदृढ आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आणि पैठणीचा खेळ अशा उपक्रमात आणि खेळात बहुसंख्य महिला सहभागी झाल्याने हिरकणी महोत्सवाची रंगत वाढली होती.

पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हिरकणी महोत्सव संपन्न झाला. या निमित्तानं तीन दिवस 25 बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. यासाठी वर्षा प्रशांत ठाकूर आवर्जून उपस्थित होत्या. शिवाय महिलांसाठी खास आरोग्य शिबीर आयोजित केलं होतं. आरोग्य शिबिरात मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची पॅप स्मिअर अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. सोबतच रक्तातील विविध घटकांची तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. एमजीएम महाविद्यालयातील तज्ज्ञांनी ही जबाबदारी घेतली होती.

हेही वाचा…  Womens Day : महिलांच्या सुरक्षिततेसाठी कुठेही कमी पडणार नाही! मुख्यमंत्र्यांचा महिला पत्रकारांशी संवाद

सायबर सुरक्षेचे धडे

सायबर फसवणूक होऊ नये यासाठी नवी मुंबई सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी महिलांना सायबर सुरक्षा या विषयावर मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. सायबर घोटाळ्यातून स्वत:ला वाचवताना ऑनलाईन फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, व्हाट्सअॅप फ्रॉड याबाबत महिलांसह सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे दुपारच्या सत्रात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हिरकणी महोत्सवास सदिच्छा भेट देत महिलांशी संवाद साधला.

या निमित्ताने स्वयंसिद्धाच्या संचालिका आणि राष्ट्रीय पारितोषक विजेत्या तपस्वी गोंधळी यांनी महिलांना स्वरक्षणाचे धडे दिले. महिलांना सुरक्षविषयक मार्गदर्शन करताना त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिके दाखवली. यामुळे महिलांमधील आत्मविश्वास वाढलेला दिसला. अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. तसेच महिलांशी थेट संवाद साधत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्याच्या शंकांचे निरसन केले. मेघना संजय कदम यांनी प्राणिक हिलरचे महत्त्व सांगतानाच मन आणि शरीर स्वस्थ ठेवण्याबाबत महिलांना सोप्या सोप्या टिप्स दिल्या. गायिका मिथिला माळी यांनी सुंदर गीत सादर करून वातावरण प्रसन्न केले.

महिलांना निरोगी आरोग्याचे महत्त्व सांगताना अभिनेत्री भार्गवी चिरमुले

खेळ पैठणीचा हा सर्वात धम्माल कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात महिलांचा उत्साह ओसंडून वाहात होता. या कार्यक्रमासाठी नाट्यगृह तुडुंब भरले होते. यावेळी चार महिलांना पैठणीची भेट देण्यात आली. या शिवाय महिलांसाठी खास ‘महाराष्ट्राची लोक संस्कृती’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यातील अनेक गाण्यांवर महिलांना ठेका धरला होता. या कार्यक्रमाचा संपूर्ण आनंद महिलांनी घेतला.

बचत गट स्टॉलचे तीन दिवस

हिरकणी महोत्सवात महिलांच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवस 25 बचत गटांचे स्टॉल लावले होते. या स्टॉलवर कापडी पिशव्या, ज्वेलरी, कपडे, खाद्यपदार्थ, चप्पल, बॅग, कपडे, क्लिनिंग प्रोडक्टस्, अगरबत्ती, पर्स, साड्या, सौंदर्य प्रसाधने अशा विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. रविवारपर्यंत (9 मार्च) बचत गटांचे स्टॉल असतील.

हिरकणी महोत्सवाच्या सांगता सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून भगिनींशी संवाद साधला. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी महिलांच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे या उद्देशाने राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. तसेच भविष्यात महापालिका महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कौतुक अन् सन्मान

आमदार प्रशांत ठाकूर तसेच माजी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत पैठणी विजेत्या महिलांचे कौतुक करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आशा स्वयंसेविकांना प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाय राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महापालिकेच्या अग्निशमन दलातील शुभांगी घुले आणि तेजश्री सांळुखे यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, कैलास गावडे, उपायुक्त रविकिरण घोडके, डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, मंगला माळवे, स्नेहल पाटील-धमाणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, डॉ. रुपाली माने, श्रीराम पवार, सुबोध ठाणेकर, वैद्यकीय अधिकारी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, उपजिल्हा प्रमुख मंगेश रानावडे आदी उपस्थित होते.

(Edited by Avinash Chandane)