Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईनवी मुंबईNavi Mumbai News : महिला दिनी महिलांच्या डिशमध्ये चक्क उंदीर, ऐरोलीतील हॉटेलचा प्रताप, रबाळे पोलिसांकडूनही महिलांची अवहेलना

Navi Mumbai News : महिला दिनी महिलांच्या डिशमध्ये चक्क उंदीर, ऐरोलीतील हॉटेलचा प्रताप, रबाळे पोलिसांकडूनही महिलांची अवहेलना

Subscribe

पनवेल : महिला दिनाचा आनंद साजरा करण्यासाठी नवी मुंबईच्या ऐरोलीमधील काही महिला पर्पल बटरफ्लाय या हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या डिशमध्ये अख्खा उंदीर आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने असे काही झालेच नाही, असा आव आणला. मात्र महिलांनी अगोदरच त्याचे व्हिडीओ, फोटो काढल्यांने हॉटेल मालकाची बोलती बंद झाली. मात्र, याबाबत तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलांना रात्री दीडपर्यंत रबाळे पोलिसांनी ताटकळत ठेवले. त्यामुळे महिलांप्रती महिला दिनी आदर व्यक्त करण्याची सरकारची ही पद्धत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा…  Raj Thackeray : महिला दिन माँ जिजाऊंच्या नावाने ओळखला जावा, राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

ऐरोलीतील सेक्टर 8 च्या गणराज सोसायटीमधील 10 महिलांनी पर्पल बटलफ्लाय हॉटेलमध्ये महिला दिनासाठी खास जेवणाचा बेत आयोजित केला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सर्व महिला हॉटेलमध्ये गेल्या. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी केलेल्या ऑर्डरमध्ये चक्क अख्खा उंदीर दिसला आणि त्या हादरून गेल्या. काहींना उलटी आली तर काहींना त्रास व्हायला लागला. त्यांनी उंदीर सापडलेल्या डिशचे फोटो काढले. मात्र, महिलांचा गोंधळ ऐकून हॉटेल व्यवस्थापनाने ती डिश पटकन गायब केली. एवढेच नाही तर महिलांच्या तक्रारीनंतर असे काही झालेच नाही, असा आव आणला. या गोंधळात हॉटेलमधून अनेक ग्राहकांनी काढता पाय घेतला आणि महिलांनी ताणून धरल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने चूक मान्य केली.

नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याबाहेर रात्री उशिरापर्यंत ताटकळत उभ्या असलेल्या महिला

मात्र, हे प्रकरण इथेच थांबले नाही. झालेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी या महिला रबाळे पोलीस ठाण्यात गेल्या तेव्हा त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांना वेगवेगळी कारणे देत रात्री दीड वाजेपर्यत ताटकळत ठेवले. अखेर रात्री उशिरा त्यांची तक्रार घेऊन हॉटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिला दिनाच्या औचित्याने एकीकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महिलांविषयी आदर व्यक्त करत असताना त्याच दिवशी महिलांना पोलीस खात्याकडून मिळालेली वागणूक शोभणारी नव्हती. आता या हॉटेलविरोधात रबाळे पोलीस कोणती कारवाई करणार आणि महिलांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)