Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईनवी मुंबईNMMC Budget : नवी मुंबईच्या अर्थसंकल्पाची भविष्याकालीन झेप, करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य

NMMC Budget : नवी मुंबईच्या अर्थसंकल्पाची भविष्याकालीन झेप, करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य

Subscribe

नवी मुंबई : शहरातील प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सौरऊर्जा अशा प्रकल्पांना गती देणारा २०२५-२६ चा अर्थसंकल्प नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी मंगळवारी मंजूर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सोयीसुविधा बरोबरच मुंबईप्रमाणे नवीन प्रकल्पांसाठी ५ टक्के निधीची तरतूद केली आहे. १३०१.०४ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह ५७०९.९५ कोटी जमा आणि ५६८४.९५ कोटी खर्चाचे आणि 25 कोटी शिलकेचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला. गेल्या वर्षी ४९२५.५० कोटींचा अर्थसंकल्प होता. यंदा त्यात ७८४.४५ कोटींची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कुठल्याही करवाढीचा बोजा नवी मुंबईकरांवर लादलेला नाही. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर केला.

हेही वाचा…  PMC Budget : करवाढीला बाय बाय, पायाभूत सुविधांवर भर, पनवेल महापालिकेचा गतीमान प्रशासनाला प्राधान्य

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उत्तम राहणीमान आणि आनंदी राहण्यासाठी शहर निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प तयार केल्याचे स्पष्ट केले. राहणीमानाबरोबरच एक विकास केंद्र म्हणून शहरांचा विकास करणे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहर आणि परिसरात उद्योग व्यापारांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता पुरक सुविधा निर्माण करण्याच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. मालमत्ता करातून यंदा मार्चपर्यत ९०० कोटींचे उद्दिष्ट साध्य होणार असून मार्च २०२६ पर्यंत यात ३०० कोटींची वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी करवसुलीसाठी कडक कारवाईचे धोरणदेखील आखल्याचे सांगितले. प्रभावी वसुलीकरीता प्रथम महापालिकेने एका संस्थेची निवड केलेली आहे. त्यामुळे नियोजित वेळेत करवसुली जमा होण्यास मदत होणार आहे.

भविष्यासाठी जलनियोजन

नवी मुंबईची लोकसंख्या १८.५ लाख असून मोरबे धरणासह एमआयडीसीच्या बारवी धरणातून जलपुरवठा केला जातो. विमानतळामुळे शहरात वाढता ओघ लक्षात घेता २०२८ मध्ये २३ लाख लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी पातळगंगा नदीतून उचलणे, तसेच भिरा जलविद्युत केंद्रातील पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन सुरु आहे. यासाठी मे. टाटा कन्सलटिंग इंजिनीअर्स या संस्थेची नेमणूक केल्याचे आयुक्तांने सांगितले. त्याचप्रमाणे २०४७ पर्यंत शाश्वत व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका सक्षमतेने काम करेल. असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आरोग्य सेवेचे सक्षमीकरण

निर्माणाधीन दिघा, कोपरखैरणेतील माता बाल रुग्णालय, एमआरआय सुविधा केंद्र, महिलांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता पालिकेच्या १७ रुग्णालयांत तपासणी चाचणी केंद्र सुरु करणे, तसेच मधुमेह रुग्णांसाठी वाशी व बेलापूरमध्ये डायलिसिस केंद्र सुरु करुन ६ हजार ५५२ रुग्णांना सुविधा पुरवणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे रुग्णसेवेसाठी ४ मेडिकल कॉलेज आणि पालिकेचे नर्सिग कॉलेज भविष्यात सुरु करण्यात येईल, असे स्पष्ट केले. आयुष रुग्णालयांच्या माध्यमातून दोन आयुर्वेदिक रुग्णालय उभारणार असल्याचे ते म्हणाले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणांवर भर

महापालिकेच्या शाळेचा दर्जा उच्चतम आहे. महापालिकेने वास्तुदेखील दर्जेदार उभारल्या आहेत. पालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये अटल लॅब उभारणे, सीबीएसई शाळांमध्ये संगणक कक्ष, विद्यार्थ्यांसाठी यंत्र व रॉबोटिक प्रणाली आणि अंतराळांची माहिती देणारे सायन्स पार्क, तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट मॉडेल, गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रशिक्षण, बौध्दिक चालना देण्यासाठी मिशन इनोव्हेशन या उपक्रमांतून आयुक्तांनी महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला आहे.

पशु रुग्णालय सुरु होणार

स्वच्छ आणि सुंदर शहरामुळे अनेक परदेशी पशुपक्षी येतात. त्यांच्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यासाठी पीपीपी तत्वावर चालवण्यासाठी नियोजन केले आहे. याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन पशु रुग्णालय कार्यन्वित केले जाईल.

११ होल्डिंग पॉण्डचा विकास

नवी मुंबईला अंथाग सागरी किनारा लाभला आहे. म्हणून शहरातील ११ होल्डिंग पॉण्ड विकसित करुन त्या ठिकाणचा नागरी वापरांबरोबर पर्यावरणाच्या अनुषंगाने प्रकल्प उभारणार असल्याचे आयुक्तांनी घोषित केले.

कागदपत्र होणार डिजिटल

ई-प्रणाली अस्तित्वात आल्याने महापालिकेने डिजिटलवर भर दिल्याचे स्पष्ट होत आहे. जुने दस्तवेज आणि नागरी कागदपत्रांचे जतन करण्यासाठी नागरी आरोग्य सुविधेअंतर्गत कागदपत्राचे डिजिटलायझेशनवर भर दिला आहे.

आयएएस प्रशिक्षण केंद्र

स्पर्धा परिक्षांमध्ये जास्तीत जास्त स्थानिकांचा सहभाग व्हावा यासाठी लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा घेत असलेल्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी सानपाडा येथे सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

महाप्रस्थान स्मशानभूमी

अंतिम संस्कारासाठी नागरिकांना धावपळ करावी लागते. त्याअनुषंगाने हैदराबाद येथील महाप्रस्थान स्मशानभूमीच्या धर्तीवर नवी मुंबईतही अंत्यविधी साहित्य, अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स, स्नानगृह, चेजिंग रुम या सुविधा महाप्रस्थान उपक्रमांतून दिल्या जाणार आहे.

नवी झेप घेण्यावर भर

महापालिका शाश्वत संस्था म्हणून काम करत आहे. नवीन विकास केंद्र म्हणून उदयास आलेल्या नवी मुंबईला गतिमान करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सूचना यामुळे नवी मुंबईने समतोल विकास साधला आहे. भविष्यात सर्वांच्या सहकार्यातून नवी झेप घेण्यावर भर असणार आहे.
– डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नमुंमपा

(Edited by Avinash Chandane)