Homeमहामुंबईनवी मुंबईपनवेल महापालिका शाळांच्या स्नेहसंमेलनात दिसली महाराष्ट्राची संस्कृती

पनवेल महापालिका शाळांच्या स्नेहसंमेलनात दिसली महाराष्ट्राची संस्कृती

Subscribe

पनवेल : ‘महाराष्ट्राची लोकधारा ’ या संकल्पनेवर आधारित पनवेल महापालिकेच्या 10 शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन दणक्यात साजरे झाले. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेमध्ये पिढ्या न पिढ्या गायली जाणारी, नृत्य केली जाणारी धनगरी गीते, गवळण, बाल्या नृत्य, वासुदेव, तारपा नृत्य, कोळीगीते, शेतकरी गीते, कोकणी गीते, गोंधळ यावर आधारित या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर सादरीकरण केले.

गणेश स्तवनाने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रामाची सुरूवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वासुदेवाच्या गाण्याने वातावरण प्रफुल्लीत केले. पुढे आई जगदंबेचा उदो उदो करत विद्यार्थ्यांनी गणा धाव रे गणा पाव रे म्हणत बाल्या नाच केला. तसेच धनगराची मेंढरे गाण्यावर धनगरांचे आयुष्य सादर केले. महाराष्ट्राच्या विविध भागांमधील वेशभूषेचा ‘फॅशन शो’ हा खास कार्यक्रम होता. यातून मराठी वस्त्र संस्कृतीचे दर्शन घडले. या संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसांडून वाहात होता. हा कार्यक्रम आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये सोमवारी (13 जानेवारी) उत्साहात झाला.

हेही वाचा…  लाखमोलाचा अटक करंडक एकदम कडक नाट्यसंस्थेला, पाटी ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी केले. यावेळी अधीक्षक किर्ती महाजन सर्व शाळांचे, विद्यार्थी उपस्थित होते. अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त प्रसेनजीत कारलेकर आणि सहाय्यक आयुक्त स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेहसंमेलन घेण्यात आले. स्नेहसंमलेन कार्यक्रमांबरोबरच बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला. उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसाने सन्मानित करण्यात आले.

पुढील वर्षी शिक्षकांच्यादेखील स्पर्धा घेण्यात येतील, असे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले. स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

बक्षिसाच्या मानकरी शाळा – मोठा गट

  1. शाळा क्रमांक 6, धाकटा खांदा
  2. शाळा क्रमांक 8, पोदी-नवीन पनवेल
  3. शाळा क्रमांक 4, कोळीवाडा पनवेल

बक्षिसाच्या मानकरी शाळा – छोटा गट

  1. शाळा क्रमांक 6, धाकटा खांदा
  2. लोकनेते दि. बा. पाटील शाळा क्रमांक 1, पनवेल
  3. शाळा क्रमांक 9, गुजराती शाळा व शाळा क्रमांक 8, पोदी


(Edited by Avinash Chandane)