पनवेल : मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर पनवेल महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता कर न भरणाऱ्या नावडे उपप्रभागातील तळोजा एमआयडीसीमधील कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. याचबरोबर कळंबोलीमधील हॉटेल्स, लॉज सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा बजावल्यानंतर सात दिवस दिवस होऊनही कर न भरणाऱ्यांना वॉरंट नोटीसा बजावल्या जातात. त्यानंतरही कर न भरणाऱ्या मालमत्ता सील करणे तसेच जप्तीची कारवाई केली जाते.
पनवेल महापालिका हद्दीतील चार विभागातील 447 मालमत्तांना जप्तीपूर्वीच्या नोटीसा आणि २७ थकबाकीदारांना वॉरंट नोटीसा यापूर्वच बजावल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता कर थकबाकीदार धास्तावले आहेत. मालमत्ता कर भरण्यासाठी पनवेल महापालिकेने सातत्याने रहिवाशांना आवाहन केले आहे. त्यानंतही कर न भरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. उपायुक्त स्वरुप खारगे आणि कर अधीक्षक महेश गायकवाड तसेच कर अधीक्षक सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली जप्ती कारवाई आणि वसुली कारवाईसाठी मनुष्यबळ वाढवण्यात येत आहे. वसुली कारवाईला गती देण्यासाठी लवकरच वसुली टीम मोठी करण्यात येणार आहे.
हेही वाचा… Murud News : उपोषण स्थगित तरीही आंदोलनाचा इशारा कायम, जाणून घ्या मुरुडमधील रस्त्याचे प्रकरण
मालमत्ता कर न भरल्यास त्याना दरमहा 2 टक्के दंड आकारला जातो. दरम्यान, लोकांच्या मनातील शंका दूर झाल्याने आता लोक स्वताहून कर भरण्यासाठी पुढे येत आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या भरण्यामध्ये भरघोस वाढ होताना दिसत आहे. पनवेल महापालिका हद्दीत साडेतीन लाख निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत.
(Edited by Avinash Chandane)