पनवेल : माजी नगराध्यक्ष, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक, जे. एम. म्हात्रे इन्फा प्रा. लि. चेअरमन, सिडकोचे माजी संचालक आणि रयत शिक्षण संस्थेत कार्यरत राहून समाजहिताला प्राधान्य देणारे जे. एम. म्हात्रे यांचा समाज दर्पण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष असताना जे. एम. म्हात्रे यांनी पनवेलच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य दिले होते. जात-धर्म-पंथाच्या पलीकडे जात मानव धर्माला त्यांनी महत्त्व दिले होते. त्यांच्या चार दशकांच्या लोकोपयोगी आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन नगराध्यक्ष असताना त्यांचे तत्कालीन सरकारकडून ‘आदर्श नगराध्यक्ष’ असे कौतुक करण्यात आले होते. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जाळे निर्माण करून अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क घेऊन इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. शिवाय रुग्णसेवा, लसीकरण, अन्नसेवा, महिला रोजगार, स्वयंरोजगार असा त्यांच्या कामाचा आवाका आहे. या सर्व कार्याची नोंद घेऊन जे. एम. म्हात्रे यांना समाज दर्पण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, पनवेल महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, गणेश पाटील, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, प्रीती जॉर्ज आदी उपस्थित होते.
समाजकार्याची दखल
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून बाबांच्या मार्गदर्शनाखाली करत असलेल्या सामाजिक कार्यांची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाज दर्पण पुरस्कार देण्यात आल्याबद्दल मी बाबांचे अभिनंदन करतो.
– प्रितम जनार्दन म्हात्रे
(Edited by Avinash Chandane)