पनवेल : मालमत्ता कर थकबाकीदारांकडून वसुली मोहीम वेग धरत असून आता पनवेल महापालिकेने मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. मार्च महिना सुरू झाल्यानंतर तीन दिवसांत तब्बल 12 मालमत्तांना सील करण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून महापालिकेने मालमत्ता कराबाबत रहिवाशांना आवाहन करून थकबाकी भरण्यास सांगितले होते. त्यातही मोठ्या थकबाकीदारांना आवाहन करून तातडीने थकबाकी भरण्यास सांगितले होते. या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जात आहे.
पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधात सुरुवातीला नोटीस बजावली जाते. त्यानंतर जप्तीचे वॉरंट बजावले जाते. त्यानंतर मालमत्ता सील केली जाते. महापालिकेने कडक कारवाई सुरू केल्यामुळे रोज कोटीच्या घरात मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे.
हेही वाचा… Water Shortage : रायगडमध्ये जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ, रांजणखार डावली ग्रामस्थांचा हंडा मोर्चा
या मालमत्तांना सील
खारघर पथकाने गुडवील इन्फीनिटी सोसायटीच्या तीन मालमत्ता सील केल्या आहेत. तसेच जोत्सना प्राईम फिटनेसवरही अशीच कारवाई केली आहे. कामोठे पथकाने एस. एम. हाडे पाटील यांच्या मालमत्तेला सील केले आहे. शिवाय कळंबोली पथकाने मार्बल मार्केटमधील जे. बी. मार्बल (प्लॉट नंबर 34, 35, 36) नारायण रावरिया (प्लॉट नंबर 118) यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच तळोजा एमआयडीसी पथकाने भारत कोच बिल्डर्सवर कारवाई केली आहे. कर अधीक्षक महेश गायकवाड तसेच कर अधीक्षक सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली जप्ती कारवाई आणि वसुली कारवाईसाठी मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात महापालिकेने 27 तर फेब्रुवारीमध्ये 21 मालमत्ता सील केल्या आहेत.
2 टक्के दंडांचा भुर्दंड
महापालिकेचा मालमत्ता कर न भरल्यास दरमहा 2 टक्के दंडाच रक्कम वाढते. म्हणून रहिवाशांनी मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. – स्वरूप खारगे, उपायुक्त, पनवेल महापालिका
(Edited by Avinash Chandane)