पनवेल : महापालिका हद्दीत किती कामे सुरू आहेत, ती कामे कधी पूर्ण होणार आहेत, कोणती कामे अडली आहेत, या सर्वांचा आढावा पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सोमवारी (24 फेब्रुवारी) घेतला. पनवेल महापालिका हद्दीत अनेक विकासकामे सुरू असून त्या सर्वांचा विभागवार आढावा त्यांनी मुख्यालयातील बैठकीत घेतला. त्याचवेळी अडथळ्यांवर मात करत सर्व कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या.
सर्व स्मशानभूमीतील सुधारणा, विविध ठिकाणच्या शाळा बांधणे तसेच काही शाळांची डागडुजी करणे, हिरकणी रुग्णालय आदी कामांचा बांधकाम विभागासोबत घेतलेल्या बैठकीत आयुक्तांनी संपूर्ण आढावा घेतला. त्याचवेळी विविध ठिकाणी शौचालय उभारण्याच्या जागांची पाहणी करण्यासाठी आरोग्य विभागास सूचना दिल्या. याशिवाय अग्निशमन विभाग, नगररचना, दिव्यांग, पाणीपुरवठा, विद्युत विभागाच्या सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा… Crime News : खालापुरातील छमछमवर पोलिसांची छापेमारी, स्वागत पूनम समुद्रा बारवर छापे
‘त्या’ जाहिरातींवर कारवाई
पनवेल महापालिका क्षेत्रातील होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरवर क्यूआर कोड लावणे बंधनकारक आहे. क्यूआर कोड नसलेल्या जाहिरातींचे होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर तात्काळ काढले जातील, तसेच त्यांच्यावर नोटीस बजावून गुन्हे दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले.
या आढावा बैठकीला उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, सहाय्यक संचालक केशव शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक नीलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपमुख्य लेखापरीक्षक संदीप खुरपे, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर तसेच सर्व विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
(Edited by Avinash Chandane)