पनवेल : रस्ता हा वाहतुकीसाठी नसतो तर गाड्या उभ्या करण्यासाठी असतो, असा गोड गैरसमज नवीन पनवेलकरांचा झाला आहे. आणि त्याला वाहतूक पोलीसदेखील साथ देत आहे, असा विचित्र प्रकार नवीन पनवेलमध्ये दिसत आहे. हा रस्ता आहे पनवेल रेल्वे स्टेशन, सीकेटी स्कूल ते नारायण नगरपर्यंतचा! चांगला दोन लेनचा जाणारा आणि येणारा हा रस्ता असला तरी दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे या रस्त्यावरून गाडी चालवायची कशी, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. तर हा रस्ता गाड्या उभ्या करण्यासाठीच असल्याचा समज झाल्याने कुणीही यावे आणि गाडी उभी करून निघून जावे, असा ‘आओ जाओ रस्ता तुम्हारा है’, अशी अवस्था या मार्गाची झाली आहे.
हेही वाचा… Raigad Politics : महेंद्र थोरवे यांची आमदारकी राहणार की जाणार, सुधाकर घारे यांच्या याचिकेत काय दडलंय
कुठल्याही रस्त्याच्या डाव्या बाजूला गाड्या उभ्या केल्या जातात. त्यातही सम-विषम तारीख असेल तर कुठल्यातरी एका बाजूला गाड्या उभ्या केल्या जातात. या सर्वांचा पनवेल रेल्वे स्टेशन ते नारायण नगर रस्त्याचा अपवाद आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि दुभाजकाच्या बाजूला गाड्या उभ्या केल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे दोन गाड्यांच्या मधून वाहन चालवावे लागत आहे. बाजूलाच सीकेटी स्कूल असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणण्या-नेण्यासाठी रिक्षा दोन्ही बाजूंना उभ्या असतात. शाळा सुटल्यानंतर या रस्त्यावरून चालणेही अवघड जाते. थोडे पुढे रेल्वे स्टेशनच्या जवळ गेल्यानंतरही दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या दिसतात. एका बाजूला रिक्षा स्टँड आणि दुसऱ्या बाजूला उभ्या गाड्या असतात. त्यामुळे या रस्त्यावरून चालणेही दिव्य करण्यासारखे आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आणि दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या करण्याची मुभा वाहतूक पोलिसांनी दिली आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. वास्तविक अशा उभ्या गाड्यांना वाहतूक पोलिसांनी तेथून नेऊन दंड आकारायला हवा. तसे न होता फोटो काढून दंडा आकारला जातो. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होत नाही आणि वाहतुकीच्या गोंधळालाही आवर बसत नाही.
वाहतूक पोलिसांनी गाड्या उचलाव्यात
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या करण्याचा हा विचित्र प्रकार राज्यातील एकमेव असावा. वाहतूक पोलीस या गाड्या उचलून का घेऊन जात नाहीत? रस्त्याच्या बाजूच्या सोसायटीत राहणाऱ्या आम्हा रहिवाशांना याचा खूप त्रास होत आहे. शिवाय सीकेटी शाळेतील विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे.
– स्टेशन रोडलगत सोसायटीतील रहिवासी
(Edited by Avinash Chandane)