पनवेल : जमा आणि खर्चाचे ताळमेळ साधत २७ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक पनवेल महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी प्रशासकीय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्याकडे सादर केले. विशेष म्हणजे यंदा कुठलीही करवाढ न करता पायाभूत सुविधांवर भर देत गतीमान प्रशासनावर भर या अंदाजपत्रकात देण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ३ हजार ८७३ कोटी ८६ लाखांची जमा आणि ३ हजार ८७३ कोटी ५९ लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक मंगळवारी महापालिकेत सादर करण्यात आले. महापालिकेची उत्पन्नासाठी संपूर्ण मदार मालमत्ता व इतर करांवर आहे. यातून १ हजार ३१७ कोटी जमा होण्याचा अंदाज आहे. तर सर्वाधिक खर्च महसुली आणि भांडवली कामांवर केला जाणार आहे. हा खर्च १ हजार १४० कोटी ५९ लाख प्रस्तावित आहे.
याशिवाय उत्पन्न वाढीवर भर देतानाच आरोग्य सुविधांवर भर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक संकल्पनांचा प्रभावी वापर, नव्या जलस्रोतांचा शोध घेणारा, स्वच्छ शहरासाठी लोकसहभागावर भर देणारा आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यावर भर देणारा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले.
बांधकाम विभाग
महापालिकेच्या स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी 158 कोटी, महापौर निवासस्थान व नवीन प्रभाग कार्यालये बांधकामासाठी ३८ कोटी, रस्त्यांचे कॉक्रिटीकरण आणि डांबरीकरण ४३७ कोटी, क्रीडांगणे ५७ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे. खारघरमध्ये नगरवाचन मंदिर आणि नाट्यगृह व वाचनालय बांधणीसाठी १४ कोटींच्या निधीची तरदूत केली आहे. शिवाय माता रमाबाई आंबेडकर भवन, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह यासाठी भरीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
- गाढी नदीलगत पूर प्रतिबंधक बंधारा बांधणे आणि पंपिग स्टेशन उभारणीसाठी 17. 50 कोटीची तरतूद केली आहे. कळंबोली नोडमधील होल्डिंग पाँडमधील गाळ काढणे व इतर अनुषांगिक उपाय योजना करण्यासाठी ३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- घनकचरा संकलन, वाहतूक व मनुष्यबळ इ कामासाठी २२१ कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
- हिरकणी माता व बाल संगोपन केंद्र -सर्व समावेशक ४५० बेडचे हॉस्पिटल उभारणीसाठी १७.५० कोटींची तर कळंबोलीत ५० बेडचे हॉस्पिटल बांधण्याकरिता १० कोटींची तरतूद
- अग्निशमन व सुरक्षा व्यवस्थापनासाठी ३९ कोटी निधीची तरतूद
- भुयारी गटार व मलनिःसारण-रु. १७८ कोटीची तरतूद
- नवीन शाळांच्या बांधकामासाठी ३४ कोटी आणि महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेने बांधलेल्या शाळेची दुरुस्तीसाठी १०.७२ कोटींचा निधी
- महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी यंदा १०७ कोटींची तरतूद
यावेळी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक नीलेश नलावडे, लेखा अधिकारी डॉ.संग्राम व्होरकाटे, उपमुख्य लेखापरीक्षक संदीप खुरपे, कार्यकारी अभियंता, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त डॉ.रुपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सर्व विभाग प्रमुख,अधिकारी उपस्थित होते.
(Edited by Avinash Chandane)