पनवेल : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर गाव येथे बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. भोपाळच्या पशुरोग प्रयोगशाळेच्या अहवालातून हे स्पष्ट झाले असून कोंबड्यांमध्ये या रोगाची लागण झाली आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. खबरदारी म्हणून १ हजाराहून अधिक कोंबड्या आणि अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या आहेत. चिरनेर येथील शेकडो कुकुट पक्षांमध्ये मरतुक आढळली असून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने गावकरी व कुकुटपालन व्यवसायिक धास्तावले आहेत.
हेही वाचा…Bharat Gogawale : भरत गोगावलेंचा थेट सुनील तटकरेंवर हल्लाबोल; शिवसेनेचे आमदार पाडण्याचे काम केले
चिरनेर गावातील महेंद्र मोकल या शेतकरी आणि कुकुटपालक सूर्यकांत म्हात्रे यांच्याकडील कोंबडयांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. काही मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर या पक्षांचे नमुने तपासणीसाठी मध्यप्रदेशमधील कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यानंतर या पक्षांचा मृत्यू एव्हीएन एन्फ्लूएंझा बर्ड फ्लू या रोगाने झाल्याचे उघडकीस आले आहे.
परिसरातील चिकनची दुकाने ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पशूसंवर्धन, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वनविभाग, परिवहन विभागाने समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई सुरु केली आहे. सदर रोगस्थिती नियंत्रणात असून कुक्कुट व्यवसायिक व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याबाबत पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा…Raigad News : माणगाव तालुक्यातील खडकोली ठरले स्वप्नातील गाव, स्वदेश फाऊंडेशनचा उपक्रम
बर्ड फ्लूच्या उद्रेकाने रहिवासी आणि कुक्कुटपालन करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे, त्यांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. चिरनेरमध्ये सुमारे दोन हजार कोंबड्या नष्ट करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.