Homeमहामुंबईनवी मुंबईPanvel problem : प्रवेशद्वाराजवळच पनवेलकरांचा जीव धोक्यात, एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा गोंधळ

Panvel problem : प्रवेशद्वाराजवळच पनवेलकरांचा जीव धोक्यात, एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा गोंधळ

Subscribe

पनवेल : वाहतुकीचा गोंधळ म्हणजे काय असतो याचा उत्तम नमुना म्हणजे पनवेल एसटी डेपोसमोर उड्डाणपुलाखालील अनागोंदी. मुंबई-पुणे महामार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे पनवेलकरांना रस्ता ओलांडणे अवघड जात होते. म्हणून एसटी डेपोसमोर उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, आता या पुलाखालून चालणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखी स्थिती आहे. पुलाखाली अत्यंत बेशिस्त वाहतूक सुरू असल्याने रस्ता ओलांडताना कुठूनही अंगावर एखादी गाडी येईल, हे सांगता येत नाही. उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या बाजूला रिक्षा उभ्या असतात. रिक्षासाठी एसटी डेपो हा पिकअप आणि ड्रॉप पॉइंट असल्याने रिक्षांची कायम वर्दळ असते.

मुख्य म्हणजे उड्डाणपुलाच्या खाली पनवेलच्या प्रवेशद्वाराजवळ नवी मुंबई परिवहन सेवेचा (एनएमएमटी) थांबा आहे. तर बाजूला नो पार्किंगचा फलक आहे. नो पार्किंग असली तरी रिक्षा उभ्या असतात आणि थांब्यावर प्रवासी उभे असतात. समोरच असलेल्या लाईन लाईन हॉस्पिटलसमोरील सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू असते. त्यामुळे थांब्यावर उभा असलेले प्रवासी वाहतुकीच्या कचाट्यात सापडलेले असतात.

पनवेल एसटी डेपोसमोरील पुलाखालील नो पार्किंगचा फलक

हेही वाचा…  Panvel problem : नवीन पनवेलकर जेरीस, खोदलेले रस्ते, काँक्रिटीकरण, बांधकामे, प्रदूषणाने त्रस्त

शिवाय थांब्याजवळ बस उभी राहिली की वाहतूक ठप्प होते. त्यामुळे बस थांबा 20 मीटर मागे किंवा 20 मीटर पुढे नेल्यास वाहतुकीची ही समस्या सुटू शकेल. तसेच नो पार्किंगमध्ये रिक्षा उभ्या करू नये, यासाठी त्यांचीही समजूत काढण्याची गरज आहे. एखादा भीषण अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा रिक्षाचालकांसाठी वेगळी व्यवस्था करणे जास्त उत्तम ठरेल.

पनवेलच्या प्रवेशद्वारासमोरच होत असलेला वाहतुकीचा झालेला गोंधळ

हेही वाचा…  Raigad News : 7 जनावरांचे बळी घेणार आजार कोणता, सुधागड तालुक्यातील घटनेने रायगडमध्ये खळबळ

सध्या पनवेलच्या प्रवेशद्वाराजवळ पनवेलकरांची कोंडी होत असून त्यातून मार्ग काढण्याची गरज आहे. यासाठी पनवेल महापालिका, नवी मुंबई परिवहन सेवा, रिक्षाचालक संघटना आणि पनवेल आरटीओ यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

(Edited by Avinash Chandane)