पनवेल : नवीन पनवेलमध्ये काही महिन्यांपासून महानगर गॅसची लाईन टाकण्याचे तसेच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कामे सुरू आहेत. यासाठी बहुतांश रस्ते खोदल्याने रस्ते अरुंद झाले असून नवीन पनवेलकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. शिवाय उडणारी धुळ यामुळे नवीन पनवेलकरांना विविध आजारांचाही सामना करावा लागत आहे. ही कामे अनेक महिन्यांपासून सुरू असून सोबत होणारे बांधकामे, पुलाचे काम, रस्त्याचे काम यामुळे नवीन पनवेलकरांना श्वास घेणेही अवघड झाले आहे.
थेट पाईनलाईनने घरगुती गॅससाठी महानगर गॅसची लाईन टाकण्याचे काम अनेक महिन्यांपासून नवीन पनवेलमध्ये सुरू आहे. त्यासाठी रस्त्याची एक बाजू खोदली जाते. काम झाल्यानंतर ती बाजू जेमतेम मातीने भरली जाते. त्यामुळे रस्त्याची वाट लागून वाहतुकीचा खोळंबा होत आहे. हे कमी म्हणून की काय आदई सर्कलजवळ चौकात अनेक महिन्यांपासून सीमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे आदई सर्कलजवळ वाहतुकींचा प्रचंड खोळंबा होत असून क्राँकिटीकरणामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य झाले आहे. परिणामी लोक आजारी पडत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदूषित हवा, त्यात नवीन पनवेलमधील रस्त्यातील कामे शिवाय विविध बांधकामे यामुळे नवीन पनवेलकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डॉक्टरांकडील गर्दीच याचे उत्तर देत आहे.
हेही वाचा… Shivaji Park : महापालिका फक्त उच्चभ्रू वस्त्यांसाठीच, शिवाजी पार्कातील धुळीचे काय?
नवीन पनवेलमधील रस्ते दरवर्षी काही ना काही कारणांमुळे खोदले जातात. ज्याचा त्रास नवीन पनवेलकरांना आणि वाहनचालकांना सहन करावा लागतो. शिवाय अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. वाहन आल्यास रस्त्यातून चालणेही अवघड जाते, इतकी नवीन पनवेलमधील स्थिती भयंकर आहे. दोन वर्षांपासून नवीन पनवेल आणि सुकापूर यांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू होते. ते काम संपले असून आता नवीन पनवेल ते पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील लोक मेटाकुटीला आले आहेत.

हा रस्ता झाल्यानंतर तो पुन्हा महानगर गॅसची पाईपलाईन, वीजपुरवठा आदी कारणांसाठी खोदण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा येथील रहिवासी व्यक्त करत आहेत. याबाबत पनवेल महापालिकेने तातडीने उपाययोजना करून नवीन पनवेलकरांचा त्रास कमी होईल असे पाहावे, अशी मागणी होत आहे.
(Edited by Avinash Chandane)