उरण : विविध समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी घेतली जाणारी आमसभा उरण तालुक्यात तब्बल 6 वर्षांनंतर म्हणजे 2018 नंतर शुक्रवारी (28 फेब्रुवारी 2025) घेण्यात आली. या आमसभेत उरणकरांनी अनेक समस्या मांडल्या. यातून उरण तालुक्यातील जनता किती त्रस्त आहे, हे स्पष्ट झाले. यावर सर्व समस्या सोडवणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. उरण पंचायत समितीने जेएनपीटी मल्टीपर्पज सभागृहात आमदार बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा आयोजित केली होती.
खोपटेमधील संजय ठाकूर यांनी उरण आगारातील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. तसेच खोपट्याला होणारा अपुरा पाणीपुरवठा, खार बांधिस्ती, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम याविरोधात तक्रारींचा सूर काढला. सत्यवान भगत यांनीही पाणी पुरवठा, जलजीवन मिशन, अपुरी कामे, भ्रष्टाचार याविरोधात आवाज उठवला. सर्व कंपनी आणि गोदामे यांच्याकडील सीआरएस फंड तसेच जेएनपीटीचा सीआरएस फंड तयार करून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, त्यासाठी आवश्यक निधी उभारावा, अशी मागणी सत्यवान भगत यांनी केली.
हेही वाचा… Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावर आमचाच दावा, समर्थनाचा प्रश्नच नाही; दानवे काय म्हणाले?
सुमित पाटील (पागोटे) यांनी पागोटे नवघर येथे महामंडळची बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचा पाढा वाचला. कृष्णा पाटील (पिरकोन) यांनी उरण-पनवेल बस सेवा कर्नाळामार्गे सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान, पिरकोन गावातील अनेक कंपन्या ग्रामपंचायतीला कर देत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. माजी उपसभापती वैशाली पाटील यांनी बेशिस्त अधिकारी आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. मुकुंद गावंड (पिरकोन) यांनीही पिरकोन ते आवरे दरम्यान रस्त्यावरील विजेचे पोल हटवणे तसेच विविध विषयावर आवाज उठवला.
याशिवाय उरण तालुक्यातील अतिक्रमण, वाढते अपघातांचे प्रमाण याकडे लक्ष वेधत मुख्य रस्त्यांवर सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली.
पदपथदिवे लावावेत, गव्हाण फाटा ते दास्तान फाटा या सर्व्हिस रोडवर उभ्या असणाऱ्या कंटेनर, ट्रॅक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून रस्ता मोकळा करावा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्याचवेळी जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील यांनी उरणच्या जनतेसाठी सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याची मागणी केली. तसेच कोणत्याही रस्त्यावर अनधिकृत पार्किंग किंवा बेकायदेशीर वाहने दिसणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. कळंबुसरे गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार, खोपटेतील एनएमएमटी बस अपघातातील म्हात्रे कुटुंबाला न्याय केव्हा मिळणार, भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीने बंदोबस्त करणार का, जातींचे प्रमाणपत्र उरण तहसील कार्यालयात का मिळत नाही, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार की नाही, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. त्याचवेळी ३९ वर्षे उलटून गेली तरी हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनचा प्रश्न सुटला नसल्याचे आमदार बालदी यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी तहसीलदार उद्धव कदम, गटविकास अधिकारी समीर वठारकर, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, सहाय्यक पोलीस उपायुक्त (न्हावा शेवा बंदर) डॉ. विशाल नेहूल, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, गट शिक्षणाधिकारी प्रियंका म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख नरेश पवार, वाहतूक विभागाचे प्रमुख अतुल दहिफळे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, प्रमुख उपस्थित होते.
(Edited by Avinash Chandane)