Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईनवी मुंबईUran News : नव्या महामार्गाला उरणमधील शेतकऱ्यांनी का केला विरोध, का बंद पाडले सर्व्हेक्षण, हे आहे कारण

Uran News : नव्या महामार्गाला उरणमधील शेतकऱ्यांनी का केला विरोध, का बंद पाडले सर्व्हेक्षण, हे आहे कारण

Subscribe

उरण : विरार-अलिबाग कॉरिडोर प्रकल्प उरण तालुक्यातून जात आहे. त्यातही कळंबुसरे गाव आणि चिरनेर गावातील जमिनी या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहे. हा प्रश्न अजून मार्गी लागलेला नसताना आता नवीन ग्रीनफिल्ड राष्ट्रीय राजमार्ग ३४८ (पागोटे ते चौक) हा प्रकल्प आला आहे. या प्रकल्पासाठी कळंबुसरे, चिरनेर गावातील भूमीपुत्रांना, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तसेच कोणालाही नोटीस न पाठवता या प्रकल्पाशी संबंधित भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांनी बुधवारी (१२ मार्च) सर्वेक्षणाला सुरुवात केली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत सर्वेक्षणाचे काम बंद पाडले.

ज्या जागेवरून राजमार्ग जाणार आहे त्या जमिनींबाबत कुणालाही न कळवता एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी थेट सर्वेक्षणाला सुरुवात केली. अधिकारी धीरज शहा, सागर रामटेके, मनिष हसोदे, नितीक्षा वाघमारे यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कळंबुसरे, चिरनेरच्या शेतात जाऊन जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. विशेष म्हणजे कळंबुसरे ग्रामपंचायत व चिरनेर ग्रामपंचायतनेही शेतकऱ्यांना कळवले नाही. गंभीर बाब म्हणजे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी दमदाटी करून सर्व्हेक्षण सुरू केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडले.

हेही वाचा…  Sudhagad News : सुधागड तालुक्यातील जंगलात कुणी तरी आहे तिथं, वन विभागाच्या गस्ती पथकाला काय दिसलं

यावेळी शेतकरी विक्रांत पाटील यांनी जोरदार युक्तिवाद करत आणि आक्रमक भूमिका घेऊन सर्व्हेक्षण बंद पाडले. उपस्थित शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून निरुत्तर केले आणि माघारी जाण्यास भाग पाडले. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले. सर्व्हेक्षण करून हजारो एकर जमीन भांडवलदारांच्या, कंपनी प्रशासनाच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला. अगोदर सर्वांना कळवा, लेखी नोटीस द्या. शेतकऱ्यांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका लावा आणि त्यानंतरच प्रकल्प मार्गी लावा, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी केली. दरम्यान, या संदर्भात एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता त्यांनी कोणतेही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सर्व्हेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

या मार्गासाठी सरकारने तीन वेळा आराखडा कुणासाठी बदलला याची चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सर्व्हेक्षण कसे करू शकता? एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी जमिनीत खड्डे खोदले, बांबू गाडले आहेत. पोलिसांनी या सरकारी अधिकाऱ्यांवर आधी गुन्हे नोंदवावेत. तसेच अगोदर बैठक लावा, नंतर प्रकल्प मार्गी लावा.
– विक्रांत पाटील, शेतकरी

आधीच जमीन घोटाळे त्यात …

तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार यांच्या भोंगळ कारभारामुळे कळंबुसरे आणि चिरनेरमधील शेतकऱ्यांना, जमीन मालकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळे आहेत. एकाची जमीन दुसऱ्यांच्या नावाने तर दुसऱ्याची जमीन तिसऱ्यांच्या नावाने आहे. जमीन एकाची तर मालक दुसराच आहे. जमीन सातबारावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळी नावे चढवण्यात आली आहेत. तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार यांच्याकडे याबाबतीत पत्रव्यवहार करूनही शेतकऱ्यांना उत्तरे मिळत नाहीत. उतारे मिळत नाहीत. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, शेतकऱ्यांना न कळवता काम सुरु झाल्याने या सर्व्हेक्षणाला सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे.
– उमेश भोईर, शेतकरी

(Edited by Avinash Chandane)