मुंबई – विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. महायुती सरकारमधील दोन मंत्री सध्या राज्यात चर्चेत आहेत. बीडमधील मस्साजोग येथली सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामध्ये मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. तोच हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील अशी चर्चा आहे, मात्र आज अधिवेशनाला सुरुवात झाली तरी त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. यावरुन विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांनी हे नैतिकतेचा संबंध नसलेलं अनैतिक सरकार असल्याचा हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, नैतिकतेचा कुठेही संबंध नसलेलं हे अनैतिक सरकार आहे. धनंजय मुंडे यांचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतील असे वाटत होते, मात्र हे अनैतिक सरकार आहे. आज दोन राजीनामे घेतले जातील असं वाटत होतं मात्र अजून एकही राजीनामा घेतला गेला नाही. त्यामुळे या सरकारला अहंकार आला आहे, असे गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.
धनंजय मुंडे यांच्यावर पीकविमा घोटाळ्यापासून संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर राजीनाम्याची मागणी होत आहे. तर अजित पवार गटाचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतरही त्यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला नाही.
नंबर प्लेटचे पैसे कोणाच्या खिशात जातात?
एचएसआरपी नंबर प्लेटच्या किमतीवरून रोहित पवार यांनी आज सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारने नंबर प्लेटसाठी अधिकचे पैसे घेतले जात असल्याचा आरोप होत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इतर राज्यातील आकाडेवारी सांगत महाराष्ट्रात कमी किंमतीत नंबर प्लेट दिली जात असल्याचा दावा केला. त्यावर रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रोहित पवार म्हणाले, गुजरातची एफटीए कंपनी महाराष्ट्रात 550 रुपयांना नंबर प्लेट देणार आहे. हीच कंपनी गुजरातमध्ये 160 रुपयांना नंबर प्लेट देते. अतिरिक्त 2 हजार कोटी गुजरातच्या कंपनीच्या खिशात जाणार आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अतिरिक्त पैसा कंपनीच्या खिशात जातो की मंत्र्यांच्या खिशात जातो? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जी नंबर प्लेट FTAकंपनी गुजरातमध्ये 160 रुपयांना देते. तीच नंबर प्लेट महाराष्ट्रात ही कंपनी 550 रुपयांना देणार आहे. याचाच अर्थ सरकारच्या माध्यमातून गुजरातची कंपनी सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारत अतिरिक्त 2 हजार कोटी रुपये काढणार आहे. हे पैसे कंपनीच्या खिशात जाणार की मंत्र्यांच्या हे सरकारने सांगण्याची गरज आहे, असंही रोहित पवार यांनी म्हंटलं आहे,

हास्यविनोदात रंगलेलं सरकार
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर टीका करताना म्हटले की, राज्यामध्ये केंद्रीय राज्य मंत्र्यांची मुलीची छेडछाड केली जात आहे. पुण्यात एसटी स्टँडवर बलात्कार होतो. बीडमध्ये धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच, दिवंगत महादेव मुंडे यांच्या आरोपींचा शोध घ्यावा यासाठी त्यांच्या पत्नीला उपोषण करावे लागत आहे. तर दुसरीकडे एका माजी मंत्र्याचा मुलगा बँकॉकला जात असल्यामुळे त्याचे विमान वळवून परत बोलावले जाते. मात्र गोरगरीबांना, समान्य लोकांना न्यायासाठी उपोषण करावे लागत आहे. याचे काहीही गांभीर्य या सरकारला राहिलेले नाही. काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते एकमेकांसोबत हास्यविनोद करण्यात रंगलेले होते. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नाही, असे दिसले.
हेही वाचा : Jitendra Awhad : हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाडांची विधानभवनात एन्ट्री अन्..’ नेमके घडले काय?
नव्या आमदारांना बोलण्याची संधी द्या – रोहित पवार
महायुती सरकारकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील सामान्य माणसाला खूप आशा आहेत, असे सांगत आमदार रोहित पवार म्हणाले की, अधिवेशनात आम्ही महिला सुरक्षा, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र त्यासाठी सरकारने आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनाही आम्ही विनंती करणार आहोत की, नवीन आमदारांना बोलण्याची संधी दिली पाहिजे.
हेही वाचा : Rohit Pawar : कोरटकरला पोलीस संरक्षण, सोलापूरकरची समितीवर निवड; फडणवीसांचा महाराजांबद्दल हाच आदर का?