Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईJitendra Awhad : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजेंचा अपमान, धमकी देणारे फरार; आता मर्द म्हणायची लाज वाटते

Jitendra Awhad : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजेंचा अपमान, धमकी देणारे फरार; आता मर्द म्हणायची लाज वाटते

Subscribe

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. आता मला माझीच लाज वाटायला लागली. आपण स्वतःला मर्द का म्हणवून घेतो, असा संतप्त सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

सांस्कृतित दहशतवाद… 

मराठी साहित्यात नवा प्रवाह रुजवणारे प्रसिद्ध कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्यावरील हल्ला चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने रोखून धरले आहे. नामदेव ढसाळ यांच्या कविता अश्लिल असल्याचा शेरा मारून सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही नामदेव ढसाळांना ओळखत नाही, असे उर्मट उत्तर दिले. यामुळे जितेंद्र आव्हाड संतापले आहेत. नामदेव ढसाळांना ओळखत नाही… त्यांच्यावरील चित्रपट अडवला जातो. हा सांस्कृतिक दहशतवाद निर्माण केला जात आहे. नामदेव ढसाळांना ओळखत नाही, त्या सेन्सॉर बोर्डाची लायकी काय आहे? असा जोरादर हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी केला.

राजाश्रयाशिवाय फरार होऊ शकत नाही…

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यावरुन विविध वाद देखील सुरु आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्याबद्दल नागपूरमधील प्रशांत कोरटकर या तथाकथित पत्रकाराने अपशब्द वापरले. एवढंच नाही तर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनाही धमकी दिली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो आता फरार आहे. तसेच शिवाजी महाराजांबद्दल राहुल सोलापूरकर यानेही अपमानास्पद वक्तव्य केले. मात्र त्याच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. कोरटकर आणि सोलापूरकर ही दोन हलकट माणसं आहेत. ते काहीतरी बोलतात आणि पळून जातात. कोरटकर गुवाहाटीला जाऊन लपला आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ही लढाई माझी नाही. तुमच्या माझ्या अस्मितेची आहे. कोरटकर आणि सोलापूरकर यांना दोन लगावत नाही, त्यांचे तोंड रंगवत नाही तोपर्यंत जीवाला शांतता मिळणार नाही. या लोकांना राजाश्रय असल्याशिवाय ते महाराष्ट्रातून गायब होऊ शकत नाही? असा आरोपही आव्हाडांनी केला.

वाल्मिक कराडच्या गँगमध्ये सामील झालं पाहिजे…

माध्यमांशी बोलत असताना विविध मुद्यांवर जितेंद्र आव्हाडांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, वाल्मिक कराडला तुरुंगात सर्व सुविधा मिळत आहे. खून करावा तर तो वाल्मिक कराडने आणि जीवन जगावे तर तेही वाल्मिक कराडनेच. आपण वेडे आहोत. असा संताप त्यांनी व्यक्त केला. आव्हाड म्हणाले, आपण वाल्मिक कारडच्या गँगमध्ये जाऊन सामील व्हावे. आज तुरुंगात त्याची बडदास्त ठेवली जात आहे. त्याची पोरं काही तरी छोट्या मोठ्या गुन्ह्यात तुरुंगात जात आहेत आणि त्याच्या बराकीत जाऊन त्याची बडदास्त ठेवली जात आहे. त्याच्या सेवेला त्याची सर्व पोरं तुरुंगात हजर आहेत. पाय दाबणे, डोकं चेपणे सर्वकाही सर्रास सुरु आहे. सरकारकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले तर ते देणार नाही. सोमनाथ सूर्यवंशींचे फुटेज यांनी दिले नाही, असा आरोपीही आव्हाडांनी फडणवीसांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारवर केला.

हेही वाचा : Namdeo Dhasal : Nonsense लोकांना नेमले म्हणूनच…, रोहित पवारांचा सेन्सॉर बोर्डासह सरकारवर निशाणा