ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये शाब्दिक वार होत आहेत. यामध्ये शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे अजित पवार गटाविरोधात सर्वाधिक आक्रमक राहिलेले आहेत. मात्र ठाण्यातील त्यांचे जुने सहकारी नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे हे अजित पवार गटासोबत आहेत. नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातून सध्या विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. अभिजीत पवार या पदाधिकाऱ्याच्या दोन दिवसांत शरद पवार गटातून अजित पवार गटात आणि त्यानंतर पुन्हा घरवापसी, यानंतर जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यात वाक्-युद्ध रंगले आहे. गुरुवारी जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांना हात जोडून हे थांबवा अशी विनंती केली होती, तर आज (शुक्रवार) अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाडांवर वैयक्तीक हल्लाबोल केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टरेटची चौकशी करण्यात यावी. त्यांच्याकडे बनावट डॉक्टरेट पदवी आहे. त्यांची चौकशी करण्यात यावी. आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राहिले आहेत. तेव्हापासून आव्हाड यांच्याविरोधात अजित पवार गटातील पदाधिकारी कामाला लागले असल्याचा आरोप आव्हाडांनी गुरुवारीच केला. आज (शुक्रवार) नजीब मुल्ला यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत. आता युद्धाला सुरुवात झाली आहे. असा इशारा ही नजीब मुल्ला यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या अभिजीत पवार यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशा प्रसंगी जितेंद्र आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी अजित पवार तसेच नजीब मुल्ला यांच्यावर अनेक आरोप केले होते. बांधकाम व्यवसायिक परमार यांच्या हत्येचा उल्लेख करुन आणखी एक परमार घडवायचा आहे का, असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला.
या आरोपांचे खंडन करण्यासाठी शुक्रवारी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना नजीब मुल्ला म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे धमकावण्याचे काम आहे. त्यांनी अभिजित पवार यांच्या पत्नीला देखील धमकवले. बऱ्याच वर्षांपासून मी शांत होतो. खानदानी असल्याने आम्ही खालच्या स्तरावर जाऊन बोलत नाही. माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर आव्हाड यांनी खोटे आरोप केले. अभिजित पवार पक्षात येत होते. मात्र, माझा त्यांच्यावर विश्वास नव्हता. अभिजित पवार यांनी बेकायदेशीर रित्या पैसे कमावले आहेत. याबाबत चौकशी करावी, याकरिता आम्ही आयकर विभाग आणि सर्व एजन्सीला कारवाई करण्याचे पत्र देणार आहोत. अभिजित पवार यांनी कुठून पैसे कमावले त्याचे सर्व पुरावे आम्ही सादर करणार आहोत, असा इशारा नजीब मुल्ला यांनी दिला.
जितेंद्र आव्हाडांच्या डॉक्टरेटची चौकशी करणार
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टररेटची देखील चौकशी करावी. ती बनावट डॉक्टरेट आहे. त्याची चौकशी करावी, याकरीता आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहे. असेही नजीब मुल्ला म्हणाले. गुरुवारी जितेंद्र आव्हाडांनी उल्लेक केलेल्या सूरज परमार प्रकरणामध्ये कोणी पैसे घेतले? आणि बळी मात्र नजीब मुल्ला झाला. असा आरोपही मुल्ला यांनी यावेळी केला. केवळ जितेंद्र आव्हाड यांना वाचवण्यासाठी नजीब मुल्ला यांचा बळी गेला, असे मुल्ला यांनी म्हटले. मला खुनी म्हणत आहेत. पण आव्हाड यांच्या संदर्भात अनेक पुरावे माझाकडे आहेत, असा दावा ही मुल्ला यांनी केला.
आता युद्धाची सुरुवात झाली…
माझ्याकडे अनधिकृतरित्या कमवलेले पैसे नाहीत, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी बंगला कसा मिळवला? असा सवाल ही मुल्ला यांनी उपस्थितीत केला. आता युद्धाची सुरुवात झाली आहे. आव्हाड यांच्या बाबतचे अनेक पुरावे बाहेर काढणार, असे मुल्ला म्हणाले.
अभिजीत पवार पलटूराम
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड अजित पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अभिजीत पवार पलटूराम आहेत. पुन्हा जितेंद्र आव्हाड कडे गेला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला.
हेही वाचा : Death Threat to Shweta Mahale : एकनाथ शिंदेंपाठोपाठ भाजपच्या महिला आमदारांना जीवे मारण्याची धमकी