Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरतोतया अधिकार्‍याकडून १२ तरुणींवर लैंगिक अत्याचार

तोतया अधिकार्‍याकडून १२ तरुणींवर लैंगिक अत्याचार

Subscribe

गुन्हे शाखेचा सायबर विभागातील अधिकारी असल्याचे भासवले. खानदानी श्रीमंत असून गल्लेलठ्ठ पगार, भरपूर मालमत्ता असल्याचे त्याने त्यात लिहिले होते. तो अनेक तरुणींना संपर्क करायचा.

वसई: गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून उच्चभ्रू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांची आर्थिक फसवणूक करून लैंगिक अत्याचार करणार्‍या तोतया अधिकार्‍याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. हिमांशू पांचाळ असे या ठकसेनाचे नाव आहे. आतापर्यंत त्याने १२ हून अधिक तरुणींना फसवून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे तसेच त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लग्न जुळविण्यासाठी मुली शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवतात. त्याचाच फायदा अहमदाबाद येथे राहणारा ठकसेन हिमांशू पांचाळ याने उठवला. त्याने आपले बनावट प्रोफाईल या संकेतस्थळावर बनवले.( 12 young women sexually assaulted by fake officer)

गुन्हे शाखेचा सायबर विभागातील अधिकारी असल्याचे भासवले. खानदानी श्रीमंत असून गल्लेलठ्ठ पगार, भरपूर मालमत्ता असल्याचे त्याने त्यात लिहिले होते. तो अनेक तरुणींना संपर्क करायचा. मग त्यांना भेटायला वसई, मुंबई परिसरातील लॉजमध्ये बोलवायचा. तेथे मुलींवर प्रभाव पाडायचा आणि त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवायचा. मुलींना तो दागिने भेट द्यायचा. पहिल्या भेटीतच तो तरुणींना शरीरसंबंध ठेवण्यााठी भाग पाडत होता. नंतर वेगवेगळी कारणे देत मुलींकडून पैसे उकळत होता. तरुणींशी संबंध बनवल्यानंतर तो फरार व्हायचा. मिरा रोड येथील ३१ वर्षांच्या तरुणीने याबाबत ६ फेब्रुवारी रोजी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर तिची ओळख हिमांशू पांचाळ (२६) याच्याशी झाली होती. त्याने तिला वसईच्या रुद्र शेल्टर या हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध देखील प्रस्थापित केले. २१ ते २३ जानेवारी रोजी त्याने तिला अहमदाबाद येथे बोलावून हॉटेल पॅरागॉन व्हिला येथेही तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या काळात आरोपी हिमांशू आणि पीडित तरुणीकडून आयफोन १६, 78 हजार रुपये रोख तसेच सोन्याचे दागिने गोड बोलून काढून घेतले. लग्न होणार असल्याने पीडित तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता.

याबाबत माहिती देताना वालीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले की, आरोपी हिमांशू पांचाळ एकाच वेळी ५ फोन, अ‍ॅपलचा लॅपटॉप वापरायचा. तो फक्त हॉटेलच्या वायफाय वरूनच मुलींशी व्हॉटसअप कॉलवरून बोलत होता. आम्ही तांत्रिक विश्लिषण करून त्याला अहमदाबाद येथून अटक केली. त्याने मागील दिड वर्षात १२ हून अधिक मुलींची अशाप्रकारे फसवणूक केल्याची माहिती सानप यांनी दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक गोरखनाद जैद, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, विश्वासराव बाबर तसेच किरण म्हात्रे, सचिन दोरकर, पांडुरंग कुडू, बाळू कुटे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


Edited By Roshan Chinchwalkar