पालघर: लांबलेल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सुर्या धरणात 21.97% पाणीसाठा शिल्लक असल्याने पालघर तालुक्यातील अनेक गावे,वसई- विरार महापालिका, तारापूर औद्योगिक वसाहतीसह पालघर जिल्हा मुख्यालयावर पाणी कपातीचे संकट ओढवणार आहे.मर्यादित पाणीसाठ्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मे महिन्याच्या अखेरीस सुर्या धरणात 28 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. महिना भरात पाणीसाठ्यात सहा टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भाग तसेच दुर्गम भाग असलेल्या मोखाडा जव्हार तालुक्यातील विहिरींनी पाण्याचे तळ गाठले असून ओढे नाले सुद्धा कोरडे पडले आहेत. या ठिकाणी अनेक गाव पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून टँकरच्या फेर्या वाढवल्यावर पण पाणी कमी पडत असल्याची ओरड ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सुर्या प्रकल्पाचे मुख्य धरण असलेल्या धामणी धरणात 21.97 टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो जुलै महिन्यापर्यंत पुरणार आहे.आजमितीला धामणी धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी मान्सूनचा लहरीपणा लक्षात घेता पाणी जपून वापरण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागा अंतर्गत सुर्या नदीवरील धामणी आणि कवडास धरणातून पिणाच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.कवडास आणि वांद्री धरणातून सिंचनासाठी पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. मे अखेर पर्यंत धामणी धरणात पाणीसाठा 21.97% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रवी पवार यांनी दिली.धरणातील सध्याचा पाणीसाठा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरणार असल्यामुळे पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवठा नियमितपणे सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
सुर्या धरणातून तारापूर औद्योगिक वसाहत,पालघर नगरपरिषद,जिल्हा मुख्यालय आणि वसई- विरार महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो.सुर्या आणि वांद्री धरणातून उन्हाळी भात शेतीसाठी कालव्यांमधून पाणी सोडले जाते.सुर्या प्रकल्पा अंतर्गतच्या कवडास धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडल्या जाणार्या पाण्यावर सुमारे तीन हजार दोनशे हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते.वांद्री धरणाच्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जात असून वांद्री धरणच्या पाण्यावर सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भातशेती केली जाते.पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी सुर्या प्रकल्पा अंतर्गत धामणी, कवडास आणि वांद्री तीन प्रमुख धरणे आहेत.जिल्ह्यातील लघुपाट योजनेतील 11 लहान धरणेही आहेत.या धरणांमध्ये 24.794 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा केला जातो.