Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरचार परीक्षा केंद्रांत २११४ विद्यार्थ्यांनी दिला दहावीचा पहिला पेपर

चार परीक्षा केंद्रांत २११४ विद्यार्थ्यांनी दिला दहावीचा पहिला पेपर

Subscribe

विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी आवश्यक बसची व्यवस्था करण्याची सूचना बसस्थानकाला आणि परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून एमएसईबीला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जव्हार येथील अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी दिली

जव्हार: तालुक्यात आज शुक्रवार २१ पासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. यासाठी जव्हार तालुका शिक्षण विभागाच्या वतीने चार परीक्षा केंद्र नियोजित केली आहेत. तर २११४ विद्यार्थी हे प्रविष्ट झाले आहेत. त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावीची परीक्षा १७ मार्चपर्यंत चालणार आहे. यात शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाकडून करावयाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. तसेच एका भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.परीक्षेच्या वेळेत काही झेरॉक्स दुकानांवर बंदी घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एसपी ऑफिसला कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी आवश्यक बसची व्यवस्था करण्याची सूचना बसस्थानकाला आणि परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून एमएसईबीला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जव्हार येथील अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी दिली .

 

विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना उपाशीपोटी जाऊ नये, वाहतूक कोंडीची शक्यता गृहीत धरून घरातून लवकर निघावे. हॉलतिकीट, घड्याळ आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी, एकाच रंगाचे काळे किंवा निळे दोन पेन आणि कंपास सोबत ठेवावी. पुरवणी दोर्‍याने बांधावी, स्टॅपलरचा वापर करू नये, लिखित स्वरूपातील कोणतेही साहित्य जवळ ठेवू नये. शब्दावर रेष असावी, दोन शब्दांमध्ये पुरेसे अंतर असावे. वारंवार पाणी पिण्यास उठू नये. वेळेचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांनी अतिरिक्त ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.

  • हर्षद मेघपुरिया, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक

 

दहावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने सर्व नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आपला बैठक आणि हॉल क्रमांक लवकर शोधता यावा, यासाठी मुले आणि मुलींसाठी गेटच्या बाहेर दोन स्वतंत्र बोर्ड लावले आहेत.शिवाय, परीक्षा केंद्रावर पुरेसे पिण्या योग्य पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विजया टाळकुटे, गट शिक्षणाधिकारी, जव्हार