भाईंदर : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीतील हटकेश परिसरात बनावट व्हीसा व पासपोर्टजवळ बाळगून भारतात अवैधरित्या वास्तव्य करणार्या ३ नायजेरियन नागरिकांना काशीगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. मिरा-भाईंदर शहरात विदेशी नागरीक भारतात अवैधरित्या घुसखोरी करुन तसेच अवैधरित्या भारतात येऊन त्यांच्या देशात परत न जाता अवैधरित्या वास्तव्य करत असल्यास अशा विदेशी नागरिकांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांनी बिट अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण व दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अवैधरित्या वास्तव्य करणार्या विदेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार गौरव इक्सलेन्सी इमारत नं. २ हटकेश येथे नायजेरीयन नागरिकांना भाडेतत्वावर रुम देणारा इस्टेट एजंट साबु शौकत अली याला पोलीस उपनिरीक्षक विजय साठे यांनी बिल्डींग खाली बोलावले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे यांनी बिल्डींगमध्ये राहत असलेल्या नायजेरीया देशाच्या नागरिकांची भेट घेवून त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करायची आहे, असे सांगितले. तिथे तपासणी केली असता नायजेरीयन नागरिक बिल्डींगमध्ये वास्तव्य करत असताना मिळून आले. त्यात ओबिन्या विनसेन्ट , विजोर जेम्स विस्डम, महीला अवसीना मीरीयम ताव या नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडे असलेल्या पासपोर्ट आणि व्हिसा अशा कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांचे पासपोर्ट व व्हिसा त्यांनी भारतात वास्तव्य करण्यासाठी बनावट तयार केले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. नायजेरीया देशाच्या विदेशी नागरिकांना ताब्यात घेवून त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह परकीय नागरीक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सचिन शेंडगे आणि पोलीस शिपाई सुनिल ठाकूर हे करत आहे.