वसई: आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय तसेच दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत२५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वसईतील १५३ शाळांत ३ हजार ६३७ इतक्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज दाखल करावे लागणार आहेत. मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक आणि दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्याला खासगी शाळांमधील २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वसई तालुक्यात १४ ते २७ जानेवारी या दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.मुदत संपल्यावर संचालक राज्यस्तरावर संपूर्ण राज्याची ऑनलाईन लॉटरी काढण्यात येईल व त्यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन पात्र उमेदवारांचे प्रवेश अंतिम करण्यात येतील अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. अर्ज भरताना काही अडचणी असल्या शिक्षण विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी माधुरी पाटोळे यांनी केले आहे.
आरटीईचे अर्ज दाखल करताना अनेकदा कागदपत्रांची कमतरता तर कधी योग्य माहिती भरली जात नसल्याने पालकांचे अर्ज पुढे जात नाहीत. यासाठी आधीच पालकांनी याची पूर्ण माहिती घेऊनच अर्ज भरावा. याशिवाय आधार कार्ड, निवासी दाखला, जात प्रमाणपत्र, उत्त्पन्न दाखला, १० शाळांची निवड यासह अन्य महत्वपूर्ण कागदपत्रे यांची पुर्तता करावी असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.