विरार : पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसई- विरार महापालिकेने तयार केलेल्या गॅस दाहिन्यांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. दुसरीकडे नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने वापराअभावी २ गॅस दाहिन्या बंद पडल्या आहेत. या गॅस दाहिन्यांचा वापर करण्यासाठी पालिकेने तयार केलेली प्रोत्साहन योजना देखील कागदावरच राहिली आहे. पारंपरिक स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने पर्यावरणाचा र्हास होतो. शिवाय प्रदूषण होत असते. एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी साधारण साडेचारशे ते पाचशे किलो लाकडे लागतात. त्याचा खर्च सुमारे अडीच हजार रुपये एवढा येतो. लाकडांसाठी जंगलात वृक्षतोड होऊन वनसंपदा नष्ट होत असते. मृतदेहाचे दहन केल्याने सतत प्रदूषण होत असते. दहनाच्या वेळी होणारे हे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणपूरक अंत्यविधी व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाअंतर्गत (नॅशन क्लिन एअर प्रोग्राम) सर्व महापालिकांना गॅस दाहिन्या लावण्याचे निर्देश देण्यात आले होते.
वसई- विरार शहर पाालिकेने साडेतीन कोटी खर्च करून नवघर,(वसई) पाचूबंदर, (वसई) विराट नगर (विरार) आचोळा (नालासोपारा) आणि समेळपाडा (सोपारा) या ५ ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या सुरू केल्या होत्या. मात्र त्याला थंड प्रतिसाद मिळाला आहे. तर विरारच्या विराट नगर आणि नालासोपारामधील समेळपाडा स्मशानभूमीतील गॅस दाहीन्या बंद पडल्या आहेत. मागील वर्षात आचोळ्यात २२४, नवघरमध्ये ४३ तर पाचूबंदर येथे १०२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. समेळपाडा येथील गॅस दाहीनीत एकदाही वापर झाला नव्हता. अखेर ती बंद पडली.
नागरिकांची मानसिकता नाही
या गॅस दाहिन्या एलपीजी गॅसवर चालविण्यात येतात. मात्र एका गॅस सिलेंडरची किंमत अडीचशे रुपये आहेत. एका गॅस दाहिनीच्या एका सिलेंडरमध्ये तीन मृतदेहांचे दहन होणार होते. गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कारासाठी पालिका कुठलेही शुल्क आकारत नाही. मात्र गॅस दाहिन्यांवर अंत्यसंस्कार व्हावे अशी नागरिकांची मानसिकता अद्यापही तयार झालेली नाही. गॅस दाहिन्यांऐवजी पारंपरिक पध्दतीने अंत्यविधी करण्याकडे लोकांचा कल आहे. त्यामुळे या गॅस दाहिन्यांचा पुरेशा प्रमाणात वापर होत नसल्याचे समोर आले आहे.
पालिकेची प्रोत्साहन योजना कागदावरच
गॅस दाहिनीऐवजी नागरिक आपल्या कुटुंबियांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पध्दतीनेच करत आहेत. यामुळे या गॅस दाहिन्या विनावापराच्या पडून आहेत. गॅस दाहिन्यांच्या वापर होत नसल्याने पालिकेला लाकडांचा खर्च करावा लागत आहे. पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार केल्यामुळे वृक्षतोड होते. शिवाय लाकूड जाळल्याने धूराचे प्रदूषण होत असते. हे रोखण्यासाठी नागरिकांनी अधिकाअधिक गॅस दाहिन्यांचा वापर करावा यासाठी पालिकेने जनजागृती करण्याचे ठरवले होते. याचाच भाग म्हणून जे नागरिक आपल्या नातलगांच्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार गॅस दाहिनीत करतील त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला जाणार होता. तसेच त्यांना मालमत्ता करातही ५ टक्के सवलत देण्यात येणार होती. मात्र या योजना कागदावरच राहिल्या आहेत.