वसई: नायगावमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात एलएलपी ग्रुपच्या गटातील ३० जणांविरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांनी भोईर कुटुंबियांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. एल.एल.पी हाऊसिंग ग्रुपचे भागीदार आणि भोईर कुटुंबिय यांच्यात येथील एका जागेच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. मागील आठवड्यात नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे संबंधित जागेची भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी आणि पंचनामा सुरू होता.त्यावेळी दोन्ही गटात वाद झाला होता. यावेळी एलएलपी ग्रुपच्या सदस्यांवर लाकडी दांडक्याने, चाकूने हल्ला करण्यात आला. याशिवाय मेघराज भोईर याने आपल्या परवानाधारक पिस्तुलातून तिघांवर गोळ्या झाडल्या. त्याने एकूण तीन फैरी झाडल्या होत्या. त्यात अनिस सिंग, विरेंद्र चौबे आणि अरुण सिंग जखमी झाले होते. तर चाकू हल्ल्यात संजय जोशी, शुभम दुबे, राजन सिंग, सचिन खाडे असे ४ जण जखमी झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी भोईर गटातील ११ जणांना अटक केली होती. भोईर कुटुंबाने देखील एलएलपी ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वैष्णवी भोईर (२७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एलएलपी ग्रुपच्या सदस्यांनी पूर्वनियोजित कट करून हॉकी स्टीक, चॉपर, चाकू आणि इतर प्राणघातक हत्यारे घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात संतोष भोईर, अखिलेश भोईर, भावेश भोईर, मेघराज भोईर आणि जयेश भोईर हे जखमी झाले,असे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मेघराज भोईर यांच्या स्कॉर्पिओ वाहनाचे नुकसान झाले आहे. तक्रारीवरून नायगाव पोलिसांनी संजय जोशी याच्यासहीत ३० जणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.