भाईंदर : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन पीडित मुलीचे न्यूड फोटो व्हायरल केल्याने पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपी राज सिंग उर्फ दविंदर चुम्मन सिंग (वय २२ वर्षे )याला तात्काळ अटक केली आहे. आरोपीने काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुलै २०२४ पासून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी स्नॅपचॅटद्वारे संपर्क करून मैत्री केली. त्याच मैत्रीतून विश्वास संपादन करून तिचे न्यूड फोटो व्हाट्सअपद्वारे पाठवण्यास तिला प्रवृत्त केले. तसेच सदरील न्यूड फोटो हे आरोपीने मोबाईलमध्ये जतन करून ठेवले. तसेच आरोपीने या मुलीकडे न्यूड व्हिडिओची मागणी करत न्यूड व्हिडिओ न पाठवल्यास तिचे असलेले नग्न फोटो तिच्या इतर मित्रांना पाठवण्याची धमकी दिली.
त्यानंतर देखील व्हिडिओ न पाठवल्याने त्याच रागातून त्याने अल्पवयीन पीडितेचे न्यूड फोटो तिच्या मित्र-मैत्रीणींना व्हाट्सअप द्वारे पाठवले. तसेच आरोपी आणि त्याचा साथीदार धनंजय शहा यांनी तिच्या घरापर्यंत पाठलाग केला आहे,असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहायता कलम ७८ सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम १२ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पुजारी हे करत आहेत.