Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरखड्ड्यात बुडून पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

खड्ड्यात बुडून पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Subscribe

उजवा तीर कालव्याचे पाणी सोडल्याने या खड्ड्यात पाणी साचले होते. पाच वर्षाची सानिका आपल्या घराशेजारी खेळत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती महावितरणने खोदलेल्या खड्ड्यात पडली.

पालघर : महावितरण विभागाने टॉवर लाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डहाणू तालुक्यात घडली आहे. सानिका संतोष पाचलकर असे मृत मुलीचे नाव आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय आणि स्थानिकांनी केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सारणी परिसरात महावितरण विभागाने मागील वर्षीच १३२ केव्ही टॉवर लाईनसाठी तीन खड्डे खोदले होते. मात्र हे खड्डे न बुजवता त्याच स्थितीत ठेवण्यात आले. उजवा तीर कालव्याचे पाणी सोडल्याने या खड्ड्यात पाणी साचले होते. पाच वर्षाची सानिका आपल्या घराशेजारी खेळत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती महावितरणने खोदलेल्या खड्ड्यात पडली.

तिचे कुटुंबीय शेतात कामात व्यस्त असल्याने तिच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. मात्र कुटुंबीय संध्याकाळी घरी परतल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच शोधाशोध सुरू केली.अखेर या खड्ड्यातील पाण्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. गुरुवारी ही दुर्दैवी घटना घडली असून याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पाचलकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Edited By Roshan Chinchwalkar