विरार : वसई- विरार शहरात गेल्या काही अनेक दिवसांपासून पत्र्याच्या शेडमध्ये उभारण्यात आलेल्या दुकानांना आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यातच मंगळवार २८ जानेवारी रोजी सकाळी विरार पूर्वेकडील चंदनसार येथील भंगाराच्या दुकानाला शॉक सर्किटने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. विरार पूर्वेकडील चंदनसार येथील पत्र्याच्या शेडमध्ये थाटण्यात आलेल्या भंगाराच्या दुकानाला शॉक सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र पत्र्याच्या दुकानांना दररोज आग लागण्याचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. शहरात पालिकेच्या नजरेसमोर पत्र्याची दुकाने वाढत चालली आहेत. मात्र पालिका बघ्याची भूमिका घेत आहे. पालिकेकडून जर पत्र्याच्या दुकानांवर कारवाई केली गेली असती तर अश्या घटना शहरात घडणार नाही, असा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.
या आगीच्या घटनेची माहिती मिळताच फुलपाडा अग्निशमन अधिकारी यांनी घटनास्थळावर धाव घेत ४० मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आग मोठी असल्याने आगीत दुकान जळून गेले आहे, अशी माहिती अग्निशमन अधिकारी योगेश चव्हाण यांनी दिली आहे.
दुकानदाराचे म्हणणे काय?
विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्या हलगर्जी पणामुळे ही भीषण आग लागली आहे. अनेक दिवसांपासून त्यांना आम्ही सांगत होती की आमच्या दुकानाच्या ठिकाणी शॉक सर्किट होत आहे. मात्र अधिकार्यांनी लक्ष दिले नाही. यामुळे आज आमच्या दुकानाला भीषण आग लागली आणि आगीत मोठे नुकसान झाले आहे, असे दुकानदार सुरेशकुमार यादव यांनी बोलताना सांगितले.