Homeमहामुंबईपालघरदुचाकीच्या हॉर्नच्या विशिष्ट आवाजाने मोठ्या चोरीचा उलगडा

दुचाकीच्या हॉर्नच्या विशिष्ट आवाजाने मोठ्या चोरीचा उलगडा

Subscribe

वसईच्या गिरीज गावात राहणारा रॉय याच्याविरोधात २० तर नालासोपार्‍यात राहणार्‍या अनुज चौगुले याच्याविरोधात १२ गुन्हे दाखल आहेत. त्यांना मोक्का अंतर्गत अटकही करण्यात आली होती.

वसई : वसईतील मयंक ज्वेलर्स दुकानावर घालण्यात आलेल्या ७१ लाखांच्या दरोड्याचा उलगडा माणिकपूर आणि वालीव पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणी म्होरक्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.दुचाकीच्या हॉर्नच्या विशिष्ट आवाजाने टोळीचा उलगडा झाला आहे. १० जानेवारी २०२५ रोजी वसईच्या बाभोळा येथे असलेले मयंक ज्वेलर्स या सराफाच्या दुकानावर दरोडा पडला होता. दोन अनोळखी व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत, कोयत्याने दुकानाचे मालक महेंद्र संघवी यांना मारहाण करत दुकानात असलेले ७१ लाखांचे दागिने लुटून नेले होते. माणिकपूर आणि वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संयुक्तपणे तपास करून हा दरोडा घालणार्‍या ५ जणांना अटक केली. त्यात रॉयल उर्फ रॉय एडव्हर्ड सिक्वेरा (४६) अनुज चौगुले (३६) या दोन मास्टरमाईंडसह सौरभ राक्षे (२७) सिताराम मोरे (५६) आणि अमर निमगोरे (२१) यांचा समावेश आहे. वसईच्या गिरीज गावात राहणारा रॉय याच्याविरोधात २० तर नालासोपार्‍यात राहणार्‍या अनुज चौगुले याच्याविरोधात १२ गुन्हे दाखल आहेत. त्यांना मोक्का अंतर्गत अटकही करण्यात आली होती.

या गुन्ह्याच्या तपासासाठी ६ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस, तसेच गुन्हे शाखा काम करत होते. पोलिसांनी ६०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले होते. आरोपी दुचाकीवरून गेले होते. मात्र त्यांचा काही माग लागत नव्हता. त्यामुळे गाडी गेली कुठे असा पोलिसांना प्रश्न पडला होता. दरम्यान, एका सीसीटीव्हीमध्ये गिरीजच्या टोकपाडा येथे एक दुचाकी एका घराजवळ हॉर्नचा विशिष्ट आवाज करत, दिवे बंद चालू करत थांबली. त्या नंतर घरातील इसम बाहेर आला आणि झटकन ते सर्व त्या घरात शिरले. हॉर्न अशाप्रकारे वाजवला जात नसल्याने पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटला. हीच घटना या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी महत्वाची ठरली. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला.ते घर रॉयल उर्फ रॉय एडव्हर्ड सिक्वेरा (४६) याचे होते. त्याची पोलिसांनी माहिती काढल्यावर तो सराईत गुन्हेगार असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करून इतर आरोपींना अटक केली. रॉय सिक्वेरा आणि अनुज चौगुले हे दोघे तुरूंगात होते. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल होते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात ते तुरूंगात सुटले होते, अशी माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले- श्रींगी यांनी दिली.दरोडा घालताना पकडले जाऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली होती, अशी माहिती माणिकूपर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील यांनी दिली.

 

अशी बनवली योजना

२ जानेवारीपासून आरोपींनी मोबाईलचा वापर बंद केला होता. प्रत्यक्ष भेटून ते योजना बनवत होते. सातारा येथे रहाणार्‍या सीताराम मोरे याने या योजनेसाठी लागणारी बंदूक, कोयता दिला. तसेच दरोडा घालण्यासाठी लागणारी दुचाकी सातारा येथून चोरी करून आणून दिली. या चोरीसाठी कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीची गरज होती. त्यासाठी सातारा येथील सौरभ राक्षे या तरुणाला घेण्यात आले.१० जानेवारीला अनुज आणि सौरक्ष यांनी दुकानात जाऊन बंदुक आणि कोयत्याच्या सहाय्याने दुकानातील ९४९ ग्रॅम वजनाचे सुमारे ७१ लाखांचे सोने लुटले. त्यावेळी रॉय गिरीज येथील घरात होता. त्यानंतर दोघे रॉयच्या घरी गेले. तेथे दागिन्याचे वजन केले. अमर निमगिरे हा या टोळीतील ५ वा सदस्य. याने सातारा येथे सोने वितळवून त्याच्या लगड तयार केल्या आणि तीन वेगवेगळ्या सोनारांना विकल्या. त्याचे त्यांना १९ लाख रुपये मिळाले. अनुज, रॉय आणि सौरभ यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये तर सिताराम याला दिड लाख रुपये देण्यात आले.


Edited By Roshan Chinchwalkar