Homeमहामुंबईपालघरगुलाबी थंडीच्या आगमनाने मॉर्निंग वॉकला पसंती

गुलाबी थंडीच्या आगमनाने मॉर्निंग वॉकला पसंती

Subscribe

मानसिक ताणालाही अनेकांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांना आळा घालण्याच्या हेतूने बहुतेकांनी मॉर्निंग वॉकचा आधार घेतल्याचे चित्र दिसत आहे.

जव्हार: हिवाळ्यात सकाळी फिरायला जाणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह असते. म्हणूनच हल्ली सकाळी फिरायला जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराच्या सनसेट पॉईंट,हनुमान पॉईंट, शिरपामाळ, जय सागर जलाशय या प्रेक्षणीय स्थळांना पसंती असल्याने पहाटेपासूनच लहान मुले, महिला व माणसांनी ही ठिकाणे फुलून गेलेली असतात.
मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जव्हार शहरात गुलाबी थंडी हळूहळू जाणवायला लागली आहे. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी व आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नागरिकांनी मॉर्निंग वॉक सुरु केले आहे. पहाटेच्या सुमारास शहरातील सर्वच प्रमुख तसेच अंतर्गत मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते गजबजल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत मानवी जीवनात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. यामुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. परिणामी,विविध आजारांची लक्षणे दिसून येऊ लागली आहे. मानसिक ताणालाही अनेकांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांना आळा घालण्याच्या हेतूने बहुतेकांनी मॉर्निंग वॉकचा आधार घेतल्याचे चित्र दिसत आहे.

 

**आरोग्याप्रती नागरिकांची सजगता वाढली**

जव्हार शहर आणि लगतच्या ग्रामपंचायत हद्दीत मॉर्निंग वॉक करणारे स्त्री-पुरुष केवळ एका वयोगटातील नाहीत. तर आबालवृद्धांसह तरुण आणि बालगोपालांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश असतो. पहाटे साडेचार वाजेपासूनच शहरातील मुख्य रस्त्यांवर किलबिलाट सुरु होतो. कुणी मोबाईलच्या गाण्यांच्या तालावर धावत असतात, कुणी नुसतेच धावत असतात, तर कुणी चालत असतात. एकंदरितच आरोग्याप्रदी नागरिक सजग झाले असल्याने मॉर्निंग वॉक करण्यांच्याही संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.